पनवेल(प्रतिनिधी) दोन वर्षाच्या कठीण काळानंतर आता शाळा नव्या उत्साहात सुरु झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला आणि ऊर्जेला एक नवी दिशा देण्याचा संकल्प श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल यांनी केलेला आहे. त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सायंकाळी ०४ वाजता 'बाल नाट्य स्पर्धेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. आणि या कार्यशाळेत बाल नाट्यांचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजू तुलालवार हे मार्गदर्शन करणार आहेत.
अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेलचे शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सोळा वर्ष या दोन्ही संस्था अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही अतिशय भव्य दिव्य स्वरुपात आयोजित करीत आहे. या स्पर्धेत अनेक होतकरु रंगकर्मीनी आपला ठसा उमटवून व्यावसायिक नाटय क्षेत्रात यशस्वी पदार्पण केलेले आहे.
पनवेल उरण परिसर हा सांस्कृतिकदृष्ट्या समृध्द परिसर असून हा कलाकारांचा प्रदेश आहे. विद्यार्थ्यांमधील अभिनय कलेला प्रोत्साहन मिळावे, त्यांना रंगमंच उपलब्ध व्हावा त्याचबरोबर एक सृजनशील पिढी तयार व्हावी म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. प्रत्येक बालकात उपजतच एक नट दडलेला असतो. याचा अनुभव आपण रोज घेतच असतो.
त्यामुळे बाल नाट्य निर्माण करणाऱ्या मार्गदर्शकांना त्यांच्या शंकांचे निरसन, आणि प्रोत्साहन देण्यासाठी परिषदेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यशाळेत जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
ReplyReply to allForward |
Tags
पनवेल