पनवेल दि १८ (वार्ताहर) : हल्ली सायबर गुन्ह्यात बरीच वाढ झाली आहे. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन व ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित राहण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने नुकताच आपल्या ग्राहकांसाठी ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी खांदेश्वर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. मा. समीर चासकर, हेड कॉन्स्टेबल मा. सुदर्शन सारंग, बँक ऑफ महाराष्ट्र, नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक पुष्पा खात्री, उप प्रबंधक अमीथा कुंदर व विशेष सहायक अरविंद मोरे उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी ए.पी.आय. मा. समीर चासकर म्हणाले की, हल्ली सायबर गुन्ह्यात बरीच वाढ झाली आहे त्या अनुषंगाने बँकेने ग्राहकांना जागृत करण्यासाठी ग्राहक मेळावा आयोजित केला ही खरोखर प्रशंसनीय बाब आहे. ते म्हणाले की ह्या गुन्ह्यांवर सुद्धा आपण अंकुश आणू शकतो तो म्हणजे थोडी सतर्कता बागाळून. ते म्हणाले की अशाप्रकारचा गुन्हा घडल्यास ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवा, तक्रार नोंदवा. त्यांनी टेलिग्राम प्रणाली मुळे रक्कम लगेच गोठविता येते असे सांगितले. त्यानंतर त्यांनी वीज बिल भरले नाही, वीज कट होईल, ओ.एल. एक्स. इत्यादी द्वारे हल्ली ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती अज्ञात व्यक्तीस न देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मा. सुदर्शन सारंग, हेड कॉन्स्टेबल म्हणाले की, ग्राहकांनी थोडे सतर्क असण्याची गरज आहे. कुठेही सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करू नका किंवा लिंक स्वीकृत करू नका. काही लिंक अनोळखी वाटल्यास लगेच ब्लॉक करा किंवा डिलीट करा
. तसेच त्यांनी बँकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन केले कारण की बरीच आधार कार्ड बोगस काढल्या गेले आहेत व ह्या बोगस आधार कार्ड द्वारे अनोळखी व्यक्तीची खाती उघडून बरेच आर्थिक गुन्हे घडले आहेत असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नवीन पनवेल शाखेच्या शाखा प्रबंधक, पुष्पा खात्री यांनी सुद्धा ग्राहकांना सतर्क राहण्याची विनंती केली. त्यांनी ग्राहकांना ओ.टी पी., सी. व्ही.व्ही. कोड न देण्याचे आवाहन केले. त्यांनी हे ही सांगितले की बँक ग्राहकांना कुठल्याही प्रकारची माहिती आपल्या ग्राहकांना मागत नाही. त्यांनी कुठलीही माहिती फोन द्वारे देऊ नये अशाप्रकारे फोन आल्यास बँकेत येऊन माहिती देतो असे कळवावे. जर आपण थोडी खबरदारी बाळगली तर नक्कीच आपण आपल्या ठेवी सुरक्षित ठेऊ शकतो असे सांगितले. याप्रसंगी बँकेचे सन्माननीय ग्राहक मा. सुभाष भोपी व सुवर्णा घाडगे यांनी बँकेने चांगला उपक्रम राबविल्या बद्दल बँकेचे आभार मानले.
तसेच त्यांनी बँकेची सेवा उत्तम असल्याबद्दल समाधान व्यक्त करून बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन अरविंद मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशश्वीते करिता अमीथा कुंदर, अरविंद मोरे, सीमा मराठे, मीनाक्षी भाकरे, राजू म्हात्रे व रुपेश पावसकर यांनी अथक परिश्रम घेतले.