पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या वतीने आयोजन
विद्यार्थी वाहक, पालक, परिवहन, वाहतूक विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार
पनवेल दि . १९ ( वार्ताहर ) : विद्यार्थ्यांना घरापासून शाळा आणि शाळेतून घरी सुरक्षितपणे ने आण करण्याच्या अनुषंगाने स्कूल व्हॅनचालक आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करत आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षितताय 'संवाद' परिषदचे आयोजन रविवारी सकाळी 11 वाजता आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात आले आहे.
या निमित्ताने लोकप्रतिनिधी, पालक विद्यार्थी ,वाहक, शालेय व्यवस्थापन प्रतिनिधी, शालेय शिक्षण विभाग परिवहन, वाहतूक आणि स्थानिक पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शाळेत सुरक्षितपणे ने -आण केली जाते. संस्थेचे सभासद हे स्कूल व्हॅन त्याचबरोबर स्कूलबस च्या माध्यमातून 'विद्यार्थी वाहक' म्हणून अत्यंत चोखपणे कर्तव्य बजावतात. 'विद्यार्थी हिताय. विद्यार्थी सुरक्षिताय' हे ब्रीदवाक्य घेऊन संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे.
कोरोना वैश्विक संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी शाळा प्रत्यक्षरीत्या सुरू झाल्या. टाळेबंदी मध्ये संस्थेच्या सभासदांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीला तोंड दिले. पालकांना सुद्धा खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. तदनंतर सर्वच शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. असे असले तरी आजही विद्यार्थी वाहकांना अनेक अडचणी, त्याचबरोबर जटिल प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा आणि मार्ग निघणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हितावह ठरेल.
त्याचबरोबर पालक वर्गांच्याही काही तक्रारी त्याचबरोबर अडचणी असू शकतील. या सर्व व्यवस्थेमध्ये शाळा व्यवस्थापन, परिवहन, वाहतूक पोलीस आणि शिक्षण विभागाची भूमिका आणि मार्गदर्शन ही महत्त्वाचे आहे. या सर्वांचा समन्वय साधने अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये 'विद्यार्थी सुरक्षितताय समन्वय परिषदेचे' आयोजन करण्यात आले आहे. या बरोबरच रस्ता सुरक्षितता चर्चा सत्र संपन्न होणार आहे. या परिषदेला पालक बंधू- भगिनी, शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, शिक्षक विद्यार्थी वाहतूक संघटना पदाधिकारी, स्कूल बस चालक मालक आणि उपस्थित राहून हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी केले आहे.
Tags
पनवेल