क्रिप्टो चलनात गुंतवणूक केल्यास जादा पैसे मिळतील असे सांगून उच्च शिक्षित तरूणाची १७ लाख रुपयांची फसवणूक



कूट चलनात (क्रिप्टो करन्सी) गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळेल असे सांगून एका उच्च शिक्षित तरूणाची १७ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार वागळे इस्टेट भागात उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी तरुणाचा विश्वास बसावा म्हणून सुरूवातीचे चार ते पाच दिवस परतावाही दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फसवणूक झालेला तरूण बीएससी-आयटी शिकलेला असून तो एका खासगी कंपनीत कंपनीत काम करतो. काही दिवसांपूर्वी त्याला समाजमाध्यमावर एक चित्रफीत मिळाली होती. या चित्रफीतीस ‘लाईक आणि काॅमेंट’ केल्यास परतावा मिळेल असे भामट्यांनी सांगितले होते. त्यानुसार तरूणाने चित्रीकरणास लाईक आणि काॅमेंट केली. त्याचवेळी तरूणाला ३०० रुपये प्राप्त झाले. काही वेळाने भामट्यांनी त्या तरूणाला मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवली. ती लिंक इतरांना पाठविल्यास पैसे मिळतील असे त्या भामट्यांनी सांगितले. तरुणाने ती लिंक इतरांना पाठविल्याने त्याचा तीन हजार रुपयांचा परतावा तरूणास मिळाला. त्यानंतर भामट्यांनी त्याला मोबाईल संदेश पाठवून क्रिप्टो चलनासाठी खाते उघडण्यास सांगितले.


१० हजार रुपयांवर १४ हजार रुपये परतावा मिळेल असेही त्यांनी सांगितले. सुरूवातीला तरूणाला १० हजार रुपयांच्या मोबदल्यात १४ हजार रुपये मिळेल. तरूणाला विश्वास बसल्याने त्याने टप्प्याटप्प्याने १७ लाख रुपये भामट्यांच्या खात्यात जमा केले. परंतु तरूणाला कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी त्यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोडे नवीन जरा जुने