राजमाता जिजाऊ जयंती सोहळा उत्साहात साजरा










महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या मातोश्री, स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांची जयंती कामोठे मध्ये उत्साहात साजरी झाली ! *राजमाता जिजाऊ जयंती उत्सव समिती कामोठे* मार्फत जिजाऊ जयंती साजरी करण्याचे हे दुसरं वर्ष आहे !


राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांचे विचार आणि संस्कार आजच्या पिढीवर झाले पाहिजेत यासाठी जयंती साजरी करण्याबरोबरच महिला सक्षमीकरण आणि महिला सबलीकरण हा सुद्धा हेतु समितीने डोळ्यासमोर ठेवला आहे !


कालच्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ यांचे प्रतिमापुजन आणि दिप प्रज्वलन करून झाली ! वर्षा पाटील, संगीता पवार, पुनम जाधव यांनी सुरपेटीच्या तालावर जिजाऊ वंदना गात आऊसाहेबांना वंदन करण्यात आले ! कु वैदेही मोरे या जिजाऊ च्या लेकीने आपल्या खणखणीत आवाजात जिजाऊ वरती व्याख्यान दिलं ! 


आई जगदंबे या गाण्यावर सुंदर असं नृत्य करत आराध्या आणि टीमने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं तर सौ. शैला शेटे आणि टीमने आई भवानी चा जागर गोंधळ करत प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या ! तर मंदाकिनी पाटील यांनी आपल्या अभिनयाने छत्रपती शंभुराजे यांच्यावरील प्रसंग सर्वांच्या नजरेसमोर उभा केला ! 


शिवकन्या महिला पथकाच्या मनिषा निळकंठ, शितल दिनकर, विद्या धाडवे, जयश्री झा, दिव्या पाटील आणि इतरांनी लाठीकाठी, तलवारबाजी करत आपल्या आविष्काराने प्रेषकांची मने जिंकली ! रणरागिणी युद्धकला प्रशिक्षण चे संस्थापक श्री अशोक पवार महाराज यांनी आपल्या खणखणीत आवाजात जिजाऊंचा इतिहास प्रेक्षकांच्या समोर उलगडला !


IMF Karate चे विद्यार्थी दिव्या पाटील, रिताषा, हर्षद यांनी दांडपट्टा या मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करुन प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवल्या ! तर रणरागिणी संस्था कामोठे च्या बाल मावळ्यांनी देखील  लाठीकाठी आणि दांडपट्टा यांचे प्रात्यक्षिक करुन उपस्थितांची मने जिंकली ! 


शिवशाहीर वैभव घरत आणि त्यांचे सहकारी यांनी आपल्या खणखणीत आवाजात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभुराजे यांच्या वरील पोवाडा गात उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं! शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाडा ऐकताना अंगावर शहारे येत होते ! दोनच राजे इथे जन्मले या पोवाड्याने उपस्थितांमध्ये स्फुल्लिंग जागवलं !


१२ जानेवारी जिजाऊ जयंती चे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत रक्ताचे पाणी करून स्वराज्य घडवण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या बांदल घराण्याचे श्री हरिश्चंद्र बांदल साहेब आणि धुमाळ घराण्याचे वंशज श्री निवृत्ती धुमाळ साहेब हे तर उपस्थित होतेच पण बांदल घराण्याची मानाची तलवार देखील दर्शनासाठी ठेवण्यात आली होती !


अशा या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपली कला दाखवलेल्या प्रत्येकाचा तसेच कार्यक्रमास उपस्थित असलेल्या मान्यवरांचा  सत्कार आऊसाहेब जिजाऊ यांची देखणी प्रतिमा देऊन करण्यात आला !


विशेष म्हणजे कोणतीही पक्षीय झालर न लागता, पक्ष संघटना नेता विरहीत असा कार्यक्रम संपन्न झाला ! परीसरातील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली !


थोडे नवीन जरा जुने