नवी मुंबई शहरात सर्वाधिक वर्दळ असलेल्या सीवूड्स वाहतूक शाखेकडे टोईंग वाहनच नाही



नवी मुंबई शहराचे रस्ते चांगले व मोठे आहेत. शहरातील वाहतूकीसाठी असणाऱ्या या रस्त्यांची अवस्था संपूर्ण शहरात बिकट झाली असून रस्ते हे वाहतुकीसाठी की पार्किंगसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहराच्या विविध विभागातील रस्ते दुतर्फा पार्किंमुळे रस्ते झाले छोटे असे चित्र असून शहरात सर्वाधिक वर्दळ ही सीवूडस मॉलच्या परिसरात पाहायला मिळते. या मॉलच्या बाहेर नो पार्किगचे फलक असताना हव्या तश्या गाड्या पार्क केल्या जातात. परंतू बेकायदा पार्किंग केलेल्या गाड्या उचलण्यासाठी सीवूड्स वाहतूक शाखेकडे टोईंग वाहनच नाही. त्यामुळे सर्वत्र बेकायदा पार्किंग पाहायला मिळत असून वाहतूक पोलीसांना मात्र ऑनलाईन दंडात्मक कारवाईचाच आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील व गंभीर होत असून शहरातील नो पार्किंग जागेतच पार्किंगची गर्दी पाहायला मिळत आहे. तर सम विषम पार्किंगचे फलक फक्त नावापुरते उरले आहेत. नवी मुंबई शहरात असलेले रस्ते हे नवी मुंबई महापालिका, रस्ते विकास महामंडळ,सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरात पालिका अंतर्गत रस्ते हे नवी मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले असून शहरातून जाणारे महामार्ग हे राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दळणवळणाच्यादृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे रस्ते हे वाहतुकीपेक्षा पार्किंगसाठीच अधिक उपयोगात येत असल्याचे चित्र नवी मुंबईतील सर्वच विभागात पाहायला मिळते. शहरात वाढती वाहनांची संख्या व पार्किंगसाठीच्या अपुऱ्या जागा यामुळे नो पार्किंगच्या ठिकाणीच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गाड्या झाल्या उदंड अशी स्थिती आहे.

 नवी मुंबईतील सर्वच रेल्वेस्थानकांच्या बाहेर पार्किंगचा खेळखंडोबा पाहायला मिळत असून शहरातील सर्वाधिक मोठा मॉल असलेल्या सीवूड्स येथील नेक्सस मॉलमुळे सीवूड्स पूर्व वव पश्चिमेला बेकायदा पार्किंग पाहायला मिळत आहे.

सीवूड्स रेल्वेस्थानकाच्या बाहेर बेकायदा वाहनांनी सर्वत्र रस्ते अडवल्याचे पाहायला मिळते. परंतू १० मिनिटासाठी बॅकेत किंवा काह कामानिमित्त दुचाकी सोडून जाताच वाहतूक पोलीस विविध विभागात दंडात्मक कारवाई करतात. परंतू या सीवूड्स परिसरात जिकडे पाहावे तिकडे रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग केले जाते.परंतू किती वाहनांना दंड करायचा वअसा प्रश्न वाहतूक पोलीसांना पडत असून दुसरीकडे बेकायदेशीरपणे गाडी पार्क केल्यावर गाडी टोईंग करण्यासाठी सीवूड्स वाहतूक शाखेकडे टोईंग वाहनच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतूक शाखेतील वाहतूक पोलीसांचा फक्त ऑनलाईन दडात्मक कारवाईवर भर पाहायला मिळतो.


थोडे नवीन जरा जुने