शिवजयंतीनिमित्त घाटी मराठी संघटना साकारणार 7 फुट उंच 150 किलो वजनाची वाघ नखाची प्रतिकृती




पनवेल दि.१७ (वार्ताहर) : पनवेलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देखाव्यासाठी प्रसिद्ध असणारे घाटी मराठी संघटनेची शिवजयंती यंदा मोठ्या दिमाखात साजरी होणार आहे. यानिमित्ताने यावर्षी वाघ नखांचा देखावा कळंबोली मध्ये साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंडळाचे सचिव मंगेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून 7 फुट आणि 150 किलो वजनाच्या वाघ नखाची प्रतिकृति साकारण्यात येणार आहे. यातून अफजलखानाच्या वधाचा इतिहास एक प्रकारे उलगडणार आहे.



छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नव्या पिढीला माहित व्हावा या उद्देशाने शासन त्याचबरोबर शिवप्रेमी संघटना विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. घाटी मराठी संघटनेच्यावतीने संस्थेचे संस्थापक स्वर्गीय संतोष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती उत्सव कळंबोली येथे सुरू झाला. या निमित्ताने विविध शिवकालीन देखावे उभारण्याची परंपरा गायकवाड आणि त्यांचे सहकारी मंगेश सूर्यवंशी, संदीप जाधव आणि इतरांनी सुरू केली. यंदा शिवजयंती उत्सवात वाघ नखांची प्रतिकृती हे विशेष आकर्षण ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खान यास जावळीच्या युद्धात वाघ नखाच्या माध्यमातून कोथळा बाहेर काढला होता


. असा इतिहास दाखला देत आहे. या पार्श्वभूमीवर घाटी मराठी संघटनेच्या वतीने पंकज सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून तब्बल ७ फुट आणि १५० किलो वजनाच्या वाघ नखांची प्रतिकृति साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर मोठ्या थाटात १०१ मशालिंची मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच पाळणा गावून १८ तारखेला रात्री १२ वाजता शिवजन्मोत्सव केला जाणार आहे.



थोडे नवीन जरा जुने