पनवेल दि.०२ (वार्ताहर) : मोटारसायकलीला ठोकर दिल्याने त्याचा जाब विचारण्याकरीता गेलेल्या पती व गरोदर पत्नीला दारूच्या नशेत असलेल्या ट्रॅफिक पोलिसाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात दिनेश ईश्वर महाजन या ट्राफिक पोलिसावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीबीडी येथील रहिवाशी असलेले पती-पत्नी खारघर येथे उपचारासाठी जात असताना त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या व दारूच्या नशेत धूत असलेल्या ट्राफिक पोलिसाची चारचाकी गाडी त्यांच्या मोटारसायकलीला गाडीला पासुन पुढे गेली. यामुळे मोटारसायकलीचा बॅलन्स गेल्याने ते पडत पडता वाचले. याबद्दल ते जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने गाडी थांबवली. गाडीत पोलीसची पाटी बोर्डवरती ठेवून मी पोलीस आहे तुला काय करायचे आहे असे दमदाटी करून शिवीगाळ करायला सुरुवात केली.
सदर पोलीस कर्मचारी दारूच्या नशेत असल्याने त्याला समजवत असताना त्याने अचानकपणे पती वर हात उचलून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने फिरवलेला हात गरोदर पत्नीच्या तोंडावर लागला. त्यामुळे पत्नी ओरडत असताना त्याने हात पकडून महिलेला बाजुला केली. यादरम्यान खारघर पोलिसांनी घटना स्थळी दाखल होत सदर ट्रॅफिक पोलिसाला ताब्यात घेतले व महिलेला तपासणी करीता रुग्णालयात पाठवण्यात आले. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी विरोधात भारतीय दंड संहिता कलम २७९, ३५४, ३२३, ५०४,५०६ व मोटरवाहन अधिनियम १८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
पनवेल