जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांच्या सोबत नवीन शेवा गावातील प्रलंबित प्रश्नांवर बैठक संपन्न







उरण दि १९(विठ्ठल ममताबादे )
 जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांच्या सोबत नवीन शेवा गावातील विविध प्रलंबित प्रश्नांवर शुक्रवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी झाली बैठक संपन्न झाली.माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनाचे जटील प्रश्न, वाढीव गावठाण व नागरी सुविधा बाबत असे विविध समस्या सोडवण्यासाठी बैठकित चर्चा करण्यात आली. या मध्ये



पाण्याच्या बीलाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. उरण तालुक्यातील शेवा गावाचे पुनर्वसन करताना पाण्याचे बील जेएनपीटी भरत होती परंतु हे बील जेएनपीटी ने भरताना जेएनपीटीला कायद्याची अडचण येवू लागली म्हणून जेएनपीटीचे त्या वेळचे चेअरमन बोंगीरवार यांनी ग्रामपंचायत टॅक्स देवू पण पाण्याचे बील देणार नाही अशी भुमिका घेतली त्यानुसार त्यांनी ग्रामपंचायत टॅक्स दिला. परंतु त्या नंतरच्या चेअरमन तसेच अधिका-यांनी सकारात्मक भुमिका न घेतल्यामुळे पाण्याचा प्रश्न तसेच ग्रामपंचायत टॅक्सचा प्रश्न जटील बनले आहेत. नवीन शेवा गावकऱ्यांची जेएनपीटीच्या विकासाला साथ देण्याची भुमिका लक्षात घेवून सकारात्मक दृष्टीने दोन्ही प्रश्न सोडविण्यात येतील असे डेप्यूटी चेअरमन यांनी अश्वस्त केले, तसेच जेएनपीटी ने ३३ : ६४ : ०५ हेक्टर जमीनीचे पैसे देवून शेवा गावाच्या पुनर्वसनासाठी दिले. सदर जमीन मेट्रो सेंटर ने बोकडवीरा सर्व्हे नंबर ११२ च्या शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला देवून प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून सिडकोकडे वर्ग केली. या जमीनीचा विकास खर्च व साडेबारा टक्के जमीन व मावेजा जोपर्यंत जेएनपीए देत नाही तोपर्यंत सिडको जमीनीचा ताबा नवीन शेवा गावकऱ्यांना देणार नाही अशी भुमिका सिडकोने घेतली आहे अशी माहिती माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपाध्यक्ष उन्मेष वाघ यांना दिली यावर तज्ञ सल्लागारांची नियुक्ती करून सकारात्मक दृष्टीने २०२३ सालीच हा प्रश्न सोडविला जाईल असे त्यांनी आश्वासन दिले.



सेझ मध्ये स्थानिक गावकऱ्यांना ५० टक्के नोकऱ्या देण्याचे जेएनपीटीने आश्वासन दिले आहे. मग नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा गावांच्या बाबतीत तसे आदेश का दिले गेले नाहीत अशी ओरड शेवे ग्रामस्थांनी केली तेव्हा उपाध्यक्ष जेएनपीए यांनी विचारणा केली की गावात जे बेरोजगार आहेत त्यांची प्रशिक्षित SKILLING होण्याची तयारी असेल तर जेएनपीए प्रशिक्षण देवून नोकऱ्या देईल. त्यासाठी त्यांनी बेरोजगारांची यादी मागविली आहे.विधवा निराधार महिलांना साफसफाईची कामे देवून त्यांच्या कुटुंबांना आधार द्यावा अशी विनंती माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी केली.


त्यावर उपाध्यक्ष जेएनपीटी यांनी सांगितले की विधवा व निराधार महिलांना सेज मध्ये प्रशिक्षण देवून रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाईल. आता साफसफाई ची परंपरागत पद्धत बदलून नवीन तंत्रज्ञान आले आहे. नवीन तंत्राच्या व अवजारांच्या सह्याने साफसफाई केली जात आहे अशा तंत्राच्या सहाय्याने साफसफाई करण्याचे प्रशिक्षण जेएनपीए कडून देण्यात येईल. त्याचप्रमाणे गावातील नागरी सुविधा त्यामध्ये रस्ते, गटारे, शाळा, लाईट, सभागृह, स्मशानभूमी इत्यादी नागरी सुविधा जे एन पी टी कडून सी एस आर फंडातून करून दिल्या जातील असे आश्वासन उपाध्यक्ष यांनी दिले आहे.





सदर बैठकीला नवीन शेवा गावच्या नवनियुक्त सरपंच सोनल घरत, गावचे अध्यक्ष कमळाकर पाटील, भाजप जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, माजी अध्यक्ष जगजीवन भोईर, शेकापचे नेते किसन सुतार, शिवसेनेचे शाखाप्रमुख शैलेश भोईर, उपसरपंच कुंदन भोईर, शेतकरी कामगार पक्षाचे गाव अध्यक्ष महेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य अशोक दर्णे, सतीश सुतार, वैशाली म्हात्रे, प्रणिता भोईर,रेखा म्हात्रे तसेच प्रमुख कार्यकर्ते निलेश घरत, अशोक म्हात्रे, दिलीप घरत, रोहित भोईर, अमित भोईर हेही या बैठकीस उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने