महामार्ग नद्या हरवल्या कचऱ्यात

पनवेल शहरालगत असलेल्या गावातील ग्रामपंचायतीकडे कचऱ्याची विल्टेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने हा कचरा परिसरातील रस्त्याच्या कडेला आणि नद्यांच्या पात्रालगत टाकला जात आहे. त्यामुळे नद्यांना अक्षरशः डम्पिंग ग्राऊंडचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याबाबत ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने कचऱ्याचा प्रश्न अधिक जटील बनत चालला आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडून केवळ दिखावा केला जात असून प्रत्यक्षात कृती काहीच दिसत नाही. परिणामी हा प्रश्न गंभीर बनला आहे. पनवेल शहरालगत सिडकोने नवीन पनवेल, कळंबोली, कामोठा, खारघर, उलवे हे नोड विकसीत केले आहेत. सध्या वडघर, तळोजा या ठिकाणी सिडको नवीन नोड विकसीत करीत आहे. मात्र या ठिकाणी भूखंड र्मयादित असून मागणीप्रमाणे घरांचा पुरवठा करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आजूबाजूच्या गावात इमारती उभारल्या आहेत. बजेटनुसार घर मिळाल्याने अनेकांनी ग्रामपंचायत हद्दीत घरे घेतली आहेत.
 परिणामी पनवेल शहरालगतच्या सुकापूर, हरिग्राम, मोर्चे, आकुर्ली, विचुंबे, पळस्पे, देवद, उसर्ली, काळुंद्रे, कोन, कोळखे या व इतर गावापर्यंत नागरीकरण पोहचले आहे. दिवसेदिवस या ठिकाणची लोकवस्ती वाढत असून बांधकामे जोरात सुरू आहेत. त्याबरोबर येथे पनवेल आणि सिडको नोडच्या तुलनेत घरे स्वस्तात मिळत असल्याने ग्राहक या भागात मोठ्या प्रमाणात घर खरेदी करू लागले आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात येथे नागरी कचरा निर्माण होत असून हा कचरा रहिवाशी मोकळया जागेत टाकून देतात. त्यामुळे गावात स्वच्छतेचा अक्षरश: बोजवारा उडत चालला आहे. काही ग्रामपंचायतीनी पॅगो गाड्या खरेदी करून कचरा गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायतींकडे व्यवस्थाच नाही. त्याचबरोबर नगरपालिका आणि सिडकोप्रमाणे पंचायतीकडे डम्पिंग ग्राऊंड तर नाहीच. याशिवाय त्यांची आर्थिक कुवत नाही, त्यामुळे ग्रामपंचायती आपला कचरा मोकळा भूखंड महामार्ग आणि नदीच्या पात्रात टाकतात. ज्या ठिकाणी नवी मुंबईत हार्दिक स्वागत असा सिडकोने फलक लावला आहे, तेथे कचरा डम्प केला जातो. एकविसाव्या शतकातील विकसीत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या प्रवेशव्दारावर कचरा पाहावयास मिळतो.. याशिवाय ग्रामपंचायती गाढी आणि काळुंद्रे नदीच्या पात्रात कचरा दिवसाढवळ्या टाकीत आहेत. एकंदरीत या कचऱ्यामुळे नदीचे पाणी दूषित होत असून त्याचा परिणाम मासळी आणि इतर जलचरांवर होत आहे. हा कचरा नदीत वाहत जाऊन खाडीला मिळतो त्यामुळे खाडीही प्रदूषित होत चालली आहे. कळंबोली ग्रामपंचायतीचा कचरा मुब्रा महामार्गालगत डम्प केला जातोय. त्याचबरोबर जवळच्या ग्रामपंचायतीचा कचरा एनएच-४बीच्या कडेला टाकण्यात येत आहे. नगररचना विभाग त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांकडून बांधकाम व्यावसायिकांना धडाधड बांधकामासाठी मंजूरी दिली गेल्या मात्र त्या अगोदर पायाभूत सुविधांचे नियोजन काय आहे, सांडपाणी त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची काय व्यवस्था आहे याबाबत पडताळणी केली जात नाही. त्यामुळे असे प्रश्न डोके वर काढत असून त्याचा परिणाम नैसर्गिक घटकांवर पडू लागला आहे. याबाबत ग्रामविकास विभागाकडूनही कोणतेही नियोजन केले जात नसल्याने कचऱ्यासारख्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या भागा नैना आली असली तरी अध्याप घनकचरा आणि सांडपाण्याबाबत कोणतेच धोरण ठरलेले नाही. त्याकरीता विलंब लागणार असल्याने घनकचऱ्यांची विल्हेवाटीचा प्रश्न अधिक जटील बनत चालला आहे.


थोडे नवीन जरा जुने