लोकनेते दि बा पाटील यांच्या जीवनावरील माहिती स्मारकातून क्यूआर कोड द्वारे प्रसारित होणार


पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या पनवेल शहरात असलेल्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात प्रकल्पग्रस्तांचे आधारवड स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांचे पुतळा स्वरूपात स्मारक उभारण्यात येणार असून त्यांच्या जीवनावरील माहिती अद्ययावत प्रणाली असलेल्या 'क्यूआर कोड' द्वारे प्रसारित केली जाणार आहे. त्या अनुषंगाने त्यांचे सोबती तसेच कार्यकर्त्यांनी लेखन स्वरूपात माहिती पाठवण्याचे आवाहन पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचले आहे. पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दमदार कारकीर्द कामगिरी दि. बा. पाटील यांची राहिली आहे. आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवासही भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे समाजहिताचे कार्य नव्या पिढीला कायम स्मरणात रहावे, यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकनेते दि. बा. पाटील यांची महती मोठी आहे. त्यांच्या कार्याचा प्रभाव फक्त पनवेल उरण नवी मुंबई, मुबंईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र, देशपातळीवर आहे. त्याला अनुसरून लोकनेते दि. बा. पाटील साहेबांच्या सोबत काम केलेले त्यांच्या सहवासात आलेल्या मान्यवर व कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, आठवणी लेखन स्वरूपात तयार करून ०५ मार्च २०२३ पर्यंत पनवेल शहरात असलेल्या महात्मा फुले सभागृहात (आगरी समाज हॉल) पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या कार्यालयात जमा करायचा आहे. या सर्व लेखनाचे संकलन करून लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या स्वर्गीय दि. बा. पाटील साहेबांच्या स्मारकाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी क्यूआर कोडच्या माध्यमातून प्रकाशित होणार आहे
 त्या अनुषंगाने पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.थोडे नवीन जरा जुने