महामार्गावर प्रत्येक ५० ते १०० किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणीची गरज - आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष







पनवेल(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम उत्कृष्ट दर्जाने आणि लवकरात लवकर होण्याबरोबरच या महामार्गावर प्रत्येक ५० ते १०० किमी अंतरावर ट्रॉमा केअर सेंटर उभारणी झाली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करत या महत्वपूर्ण विषयावर शासनाचे लक्ष वेधले. 







          आमदार प्रशांत ठाकूर यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नात म्हंटले कि, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना या आश्वासनाची पूर्तता करण्यास एनएचएआय अपयशी ठरल्याने तसेच १२ वर्षांपासून या महामार्गाचे काम प्रलंबित असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या कामांबाबत मा. उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे जानेवारी २०२३ मध्ये निदर्शनास आले आहे. पनवेल ते इंदापूर मधील सुरुवातीचा ० ते ४२ कि.मी. च्या पट्टयाचे काम पुर्ण झाल्याचे प्रतिज्ञापत्र एनएचएआयने मा. न्यायालयासमोर सादर केले असून याच मार्गादरम्यानच्या ४२.३ कि.मी. ते ८४.६ कि.मी. च्या रस्त्याचे कंत्राट देण्यात आलेल्या मेसर्स कल्याण टोल इन्फ्रा लि. या कंपनीने कोणतेही काम केलेले नाही. या महामार्गाच्या कामाची जबाबदारी ही राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची असून काम मोठ्या प्रमाणात अपूर्ण असतानाही तसेच राज्य शासनाकडून या विषयी प्राधान्याने कोणतीही कार्यवाही होत नसतानाही या संपूर्ण टप्प्याचे काम मे २०२३ पर्यंत पुर्ण होईल अशा स्वरुपाचे प्रतिज्ञापत्र मुख्य सरकारी वकिल यांनी मा. न्यायालयात सादर केले आहे.





 तसेच या महामार्गाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झाले असून या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्डयांमुळे येथे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, असे असताना या महामार्गावर अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तात्काळ मिळण्याबाबत प्रत्येक ५० किंवा १०० कि.मी. अंतरावर एक ट्रामा सेंटर उभारण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून महामार्गाची प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करुन निकृष्ट काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच ट्रामा केअर सेंटर उभारणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा सवाल या तारांकित प्रश्नातून शासनाला केला. 


          या प्रश्नावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण आणि रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना या आश्वासनाची पूर्तता करण्यास एनएचएआय अपयशी ठरल्याने तसेच १२ वर्षांपासून या महामार्गाचे काम प्रलंबित असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या कामांबाबत मा. उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याची बाब खरी आहे. पनवेल ते इंदापूर मधील सुरुवातीचा ० ते ४२ कि.मी. च्या पट्टयाचे काम पुर्ण झाल्याचे प्रतिज्ञापत्र एनएचएआयने मा. न्यायालयासमोर सादर केले असून याच मार्गादरम्यानच्या रस्त्याचे कंत्राट देण्यात आलेल्या मेसर्स कल्याण टोल इन्फ्रा लि. या कंपनीने काम केलेले नसल्याची बाब अंशत: खरी आहे



. त्या अनुषंगाने कि.मी. ४२.३ ते कि.मी. ८४.६ लांबीमध्ये असलेला दोन लेनचा रस्ता वाहतूकीच्यादृष्टीने रस्त्याचा खराब भाग डांबरीकरणाने दुरुस्त करण्याचे मंजूर असून त्या संदर्भातील कामे प्रगतीपथावर आहेत. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांचे अखत्यारीत चौपदरीकरणाचे उर्वरीत कि.मी.४२ ते कि.मी. ८४ या लांबीचे काम १८ महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेली कि.मी. ८४/०० ते कि.मी. ४५०/१७० या लांबीचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई गोवा महामार्गांच्या लांबीतील पावसाळयात पडलेले खड्डे माहे डिसेंबर २०२२ पूर्वी भरण्यात आले असून तद्नंतरही चालू कामामुळे, अवजड मशिनरी फिरत असल्याने पडलेले खड्डे व वळण रस्त्यावरील वाहतूक वर्दळीमुळे पडणारे खड्डे भरण्याचे काम नियमितपणे सुरु आहे. महामार्गावर मुंबई गोवा महामार्गाचे इंदापूर ते करोडी परशुराम घाट (कि.मी.८४/०० ते कि.मी. २०५/४००) या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे असलेल्या लांबीमध्ये कि.मी. १२६.५०० मौजे महाड येथे ट्रामा सेंटर उपलब्ध आहे. तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग
प्राधिकरणातर्फे खारपाडा टोल नाका येथे १ व सुकेळी घाट येथे ०१ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच अपघातग्रस्तांना वैद्यकीय सेवा तात्काळ मिळण्याबाबत प्रत्येक ५० किंवा १०० कि.मी. अंतरावर एक ट्रामा सेंटर उभारण्याची गरज असल्याचेही नामदार रविंद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले. 


थोडे नवीन जरा जुने