पनवेल दि.०२ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेच्या जाचक करप्रणालीचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. महाविकास आघाडीने यापूर्वी ठिय्या आंदोलन करून या विषयाला वाचा फोडली होती. आंदोलनादरम्यान आश्वासने देत चालढकल करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेला धडा शिकविण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून येत्या १३ मार्च रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीचे नेते मा.आ.बाळाराम पाटील यांनी आज बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहांमध्ये या मोर्चाच्या आयोजनासाठी आज विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्यासह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू, मा.नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, काँग्रेस नेते आर सी घरत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, मा विरोधीपक्षनेते प्रीतम म्हात्रे, सतीश पाटील, दीपक घरत, शशिकांत डोंगरे, ज्ञानेश्वर बडे, शिवदास कांबळे, शशिकांत बांदोडकर, कॅप्टन कलावत, नारायण घरत, काशिनाथ पाटील, फारुख पटेल, मल्लिनाथ गायकवाड, मा नगरसेवक गणेश कडू, रवींद्र भगत, महादेव वाघमारे यांच्यासह
महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, सामाजिक संस्था, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मा आ बाळाराम पाटील यांनी सांगितले कि, पनवेल महानगरपालिका करप्रणालीच्या बाबतीत हुकूमशाही पद्धती अवलंबत आहे. अन्यायकारक पद्धतीने कराचा बोजा पनवेलच्या नागरिकांवर लादू देणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीने येत्या १३ मार्चला पनवेल महानगरपालिकेवर महामोर्चा काढणार असून यासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून भाजपप्रणित महानगरपालिकेचा निषेध करावा असे सांगितले.
तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले कि, जाचक करवाढीच्या विरोधात सर्वांनी ताकदीने रस्त्यावर उतरले पाहिजे. यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अंतर्गत गटबाजी टाळावी व एकत्र येऊन येथील आमदार प्रशांत ठाकूर यांना जाब विचारला पाहिजे. बाळाराम पाटील यांच्या पराभवाची सल सर्व कार्यकर्त्यांच्या मनात लागली असून आता त्वेषाने रस्त्यावर उतरून भाजपच्या विरोधात जनजागृती करायला पाहिजे असे सांगितले. तर सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांनी आपल्या भाषणात नुसत्या बैठका घेण्यापेक्षा आता त्या त्या प्रभागात जाऊन तेथील भाजपच्या नगरसेवकाला जाचक करप्रणाली विरोधात जाब विचारला पाहिजे तसेच त्यांच्या निषेधार्थ फलक नाक्या नाक्यावर लावावेत तरच खऱ्या अर्थाने जनजागृती होईल. आज महानगरपालिका हि त्याकाळी असलेल्या ग्रामपंचायतीने ठेवलेल्या ठेवीवरच चालत असल्याचेही त्यांनी सांगितले
. तर पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध करीत न्यायालयीन लढयाबरोबर रस्त्यावरची लढाई तितकीच महत्वाची असल्याचे नमूद केले. याबैठकीला अनेकांनी आपल्या भूमिका मांडताना भाजपप्रणीत महानगरपालिकेचा निषेध केला.
Tags
पनवेल