महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा खोपटे गावातील ग्रामस्थांना फटका






.देयक दिनांकाच्या तारखेनंतर ग्रामस्थांना मिळते वीज बिल. 
उशिरा वीज बील मिळाल्यास वीज बील न भरण्याचा खोपटे ग्रामस्थांचा महावितरणाला इशारा.
वेळेत वीज बीले देण्याची खोपटे ग्रामस्थांची निवेदनाद्वारे मागणी.





 उरण दि. 14 (विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यात पुन्हा एकदा महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. खोपटे गावात उशिरा मिळणा-या वीज बीलाच्या घटनेवरून महावितरणाचा भोंगळ कारभार सर्वासमोर आला आहे.उरण तालुक्यात खोपटे ग्रामपंचायत हद्दीत (खोपटे गावात )ग्रामस्थांना कधीच वेळेत वीजेचे बील मिळत नाही. वीजेची बील भरायची तारीख संपल्या नंतर वीजेचे बील मिळत असल्याने ग्रामस्थांना उशिरा वीज बिल मिळत असल्याने अधिक पैसे देऊन दंड भरावा लागत आहे. महावितरणाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्यात ग्राहकांना वेळेत वीज बिल देणे बंधनकारक आहे. 



प्रत्येक महिन्यात महावितरण वीज कंपनी सर्वांना वीज बिल देत असते.देयक दिनांक संपण्याच्या अगोदर वीज बिल ग्राहकांच्या हातात देणे बंधनकारक असताना मात्र खोपटे ग्रामस्थांना देयक दिनांकच्या(पैसे भरायची शेवटची तारीख )नंतर वीज बिले मिळत असल्याने तारखेनंतर पैसे भरल्यास वीजेच्या बीलाचे पैसे व दंडाचे पैसे एकत्रित भरावे लागतात. उशीरा वीज बिल मिळाल्याने ग्राहकांना विनाकारण दंड भरावा लागत आहे. वारंवार होणाऱ्या या महावितरणाच्या कारभाराला खोपटे ग्रामस्थ वैतागले असून जर वेळेत वीज बील मिळाले नाही तर यानंतर वीजेचे बील भरणार नाही. तसेच बील भरले नाही म्हणून जर कोणी महावितरणचे अधिकारी कर्मचारी वीज कट करायला आले, विजेचे कनेक्शन बंद करायला आले तर ते सुद्धा करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका खोपटे ग्रामस्थांनी घेतली आहे.त्या अनुषंगाने निलेश जगत भगत-अध्यक्ष ग्रामस्थ मंडळ खोपटे , अलंकार मनोहर पाटिल- उपाध्यक्ष खोपटे, कुमार गन्नाथ ठाकूर-सचिव ग्रामस्थ मंडळ खोपटे, महेंद्र महादेव पाटिल- पाटीलपाडा अध्यक्ष,लक्ष्मण बाळकृष्ण घरत अध्यक्ष देऊळपाडा,यशवंत अनंत ठाकूर अध्यक्ष द. पी.



 पाडा,राजेंद्र पंढरीनाथ म्हात्रे अध्यक्ष म्हात्रेपाडा,संतोष जनार्दन पाटिल अध्यक्ष मखारेपाडा, प्रमोद पांडुरंग ठाकूर तंटामुक्ती गाव अध्यक्ष, महेंद्र मोरेश्वर पाटिल माजी पाणी कमिटी सभापती आदी पदाधिकाऱ्यांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनवले व नायब तहसीलदार नरेश पेढवी यांची भेट घेतली.वीजेचे बील वेळेत मिळावे. तारीख, संपण्याच्या किमान 10 दिवस अगोदर ग्रामस्थांना वीज बील मिळावी अशी मागणी ग्रामस्थ मंडळ खोपटेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण वीज कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय सोनवले यांच्याकडे पत्रव्यवहार करून केली आहे. निवेदन देऊन वीजेच्या विविध समस्या त्वरित सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नायब तहसिल नरेश पेढवी यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले.



 या नंतर वीजेचे बीले वेळेत सर्वांना मिळतील असे आश्वासन विजय सोनवले (अतिरिक कार्यकारी अभियंता महावितरण उरण)यांनी खोपटे ग्रामस्थांना दिले, खोपटे गावातील समस्या सोडविण्यास प्राधान्य देऊ असे नायब तहसीलदार नरेश पेढवी यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. खोपटे गावातील ग्रामस्थांची कोणतेही चूक नसताना विनाकारण वीज बीलाचे अतिरिक्त शुल्क (दंड) भरावा लागत आहे. महावितरण वीज कंपनीचा भोंगळ कारभाराचा फटका खोपटे गावातील ग्रामस्थांना बसला असून याबाबत खोपटे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.


थोडे नवीन जरा जुने