भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून रसिकांना पुन्हा अनुभवता येणार ‘जाणता राजा’ पनवेल दि.०८ (वार्ताहर) : महाराष्ट्राच्या नाट्यपरंपरेच्या वैभवशाली इतिहासात अजरामर झालेलं महानाट्य ‘जाणता राजा’ पुन्हा एकदा मराठी रसिकांच्या भेटीला येत आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष व कलाप्रेमी एडवोकेट आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून पुन्हा एकदा ‘जाणता राजा’ हे महानाट्य 14 ते 19 मार्च दरम्यान दादरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्क येथील शिवतीर्थावर रसिकांना अनुभवता येणार आहे. मुंबईतील प्रख्यात सुगी ग्रुपच्या प्रायोजकत्वातून हे प्रयोग सादर होणार आहेत.
महाराष्ट्र भूषण, पद्म विभूषण, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि दर्जेदार ओघवत्या लेखनातून हे महानाट्य जन्माला आले. 14 मार्च रोजी शिवतीर्थावर भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एका वेळेस दहा हजारांहून अधिक रसिक प्रेक्षकांना हे महानाट्य पाहता येणार आहे.या संदर्भात बोलताना ऍडव्होकेट आशिष शेलार म्हणाले की, “जाणता राजा” च्या निमित्ताने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचे प्रेरणादायी महापर्व शिवतीर्थावर अनुभवायला मिळणार आहे. नव्या पिढी पर्यंत महाराजांचे महान कार्य पोहचविण्याचा हा आमचा प्रयत्न असून हा प्रयोग म्हणजे मुंबईकरांना प्रेरणा देणाराच ठरेल’. या महानाट्याचे प्रायोजक सुगी ग्रुपचे संचालक निशांत देशमुख म्हणाले की, “छत्रपती शिवराय हे तमाम मराठी आणि देशभरच्या प्रत्येक घराघरात पूजले जाणरे दैवत आहे. छत्रपतींचे जीवन महानाट्याच्या माध्यमातुन आजच्या पिढीला पुन्हा एकदा अनुभवता यावे व जनमानस पुन्हा अलौकिक अशा शिवचरित्राशी जोडले जाऊन हा सुवर्ण शिवकाल पुन्हा एकदा जगता यावा या उद्देशाने आम्ही 'जाणता राजा' हे महानाट्य लोकांसमोर आणत आहोत.
आमच्यासाठी हे महानाट्य मुंबईकरांसाठी प्रस्तुत करणे आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे.” हे महानाट्य केवळ पाहण्यासाठी नाही तर त्याची अनुभूती घेण्यासाठी प्रत्येकाने यायलाच पाहिजे, असेही आवाहन देशमुख यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य पराक्रमाचा महापट केवळ तीन तासात सादर करणे अशक्य होते मात्र आव्हान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिरावर घेत खुल्या मैदानात शिवजन्माच्या पूर्वीचा महाराष्ट्र ते छत्रपतींचा राज्याभिषेक या दोन महत्त्वाच्या घटनांमधील महानाट्य रंगमंचावर साकार करण्यात यश मिळवले. त्यामुळे या महानाट्याची अनुभूती पुन्हा एकदा घेणे, ही मराठी रसिकांसाठी 'सुगी'चे दिवस ठरणार आहे. ८० फूट लांब आणि चाळीस फूट रुंद असलेल्या प्रशस्त रंगमंचावर हत्ती, घोडे आणि 250 कलाकारांसह मराठी शाही सुवर्णकाळ उतरताना रसिकांच्या अंगावर रोमांच उभे राहिल्याशिवाय राहत नाहीत
. विशेष म्हणजे या संपूर्ण महाराष्ट्रात एकही व्यावसायिक कलाकार नाही. तसेच एक रुपयाही मानधन न घेता कलावंत केवळ छत्रपती शिवरायांच्या प्रेमापोटी आपली कला लोक परंपरेसह सादर करीत असतात. एवढ्या प्रचंड कलावंतांचा आणि प्राण्यांचा ताफा असलेल्या या महानाट्याचे आजवर तेराशे हून अधिक प्रयोग झाले असून हिंदी भाषेतही अनेक प्रयोग झाले आहेत जगभरात या महानाट्याचे स्वागत आणि कौतुक झाले.
Tags
पनवेल