ट्रेलरचालकाने चहा टपरीचालकावर केले तलवारीने वार
पनवेल दि.१६ (वार्ताहर) : पनवेल येथील पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील कातकरी वाडी येथे एका ट्रेलरचालकाने किरकोळ कारणावरून चहा टपरीचालकावर तलवारीने वार केल्याची घटना घडली. या घटनेत टपरीचालक जखमी झाला. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे (३०) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.


चहा टपरीचालकाचे नाव रामआशीष सरोज (५२) असे असून त्याची टपरी पळस्पे ते जेएनपीटी रोडवरील मामाच्या धाब्याजवळ आहे. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आरोपी ट्रेलरचालकाने आपल्या ताब्यातील ट्रेलर रामआशीष याच्या टपरीसमोर उभा केला. यावेळी तेथील सुरक्षारक्षकाने ट्रेलरचालकाला तेथून ट्रेलर काढण्यास सांगितले, मात्र त्याने सुरक्षारक्षकाचे न ऐकता आपला ट्रेलर त्याच ठिकाणी उभा केला.


 ही बाब सुरक्षारक्षकाने घराच्या बाहेर झोपलेल्या रामआशीषला सांगितल्यानंतर त्याने ट्रेलरचालकाला त्याच्या टपरीसमोर ट्रेलर का उभा केला, अशी विचारणा केली. या गोष्टीचा ट्रेलरचालकाला राग आल्याने त्याने आपल्या गाडीमधून तलवार काढून त्याच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. या घटनेनंतर पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालक राहुल भाऊसाहेब गांजे याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.


थोडे नवीन जरा जुने