पनवेल(प्रतिनिधी) दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला २५ वर्ष झाले आहे. त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय 'रौप्य वर्ष महोत्सव समारंभ' होणार असून हा समारंभ शनिवार दिनांक ११ मार्च रोजी दुपारी ०३ वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.
यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व आमदार प्रशांत ठाकूर, उरण मतदार संघाचे आमदार महेश बालदी, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमल, माजी उपमहापौर सीता पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, वर्षा ठाकूर, संजय भगत, राज अलोनी, प्रकाश भगत, हरिश्चंद्र पाटील, भरत ठाकूर, संजय पाटील, पनवेल शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, पनवेल शहर भाजपचे अध्यक्ष जयंत पगडे, भागुबाई चांगु ठाकूर विधी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या धनश्री कदम, रामशेठ ठाकूर कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रुपेंद्र गायकवाड त्याचबरोबर चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील, रौप्य महोत्सवी समारंभाचे समन्वयक डॉ. डी. एस. नारखेडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा सत्कार व महाविद्यालयातील विविध विभागांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
पनवेल तथा सभोवतालच्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना दर्जेदार, कौशल्याधारित, व्यवसायाभिमुख तथा मूल्याधिष्ठित शिक्षण स्थानिक पातळीवर प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी कर्मवीर भाऊराव पाटील आणि जनार्दन भगत साहेबांच्या वैचारिक वारसातून १९९२ रोजी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर म्हणजेच २६ सप्टेंबर १९९७ रोजी चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ची स्थापना करण्यात आली. चांगु काना ठाकूर महाविद्यालयाची स्थापना २६ सप्टेंबर १९९७ रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली. महाविद्यालयाची स्थापना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण व शहरी विभागातील गोर गरीब विद्यार्थ्यांना कमी शुल्कामध्ये व्यवसायाभिमुख शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करून भारताचा जबाबदार नागरीक बनवणे हा आहे. अनेक विद्यार्थ्यांना कमी गुणांमुळे, अधिक शुल्क व आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे इच्छा असूनही शहरामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचे शिक्षण घेणे परवडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थेने अनेक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. प्रथम संस्थेने कला, वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रम सुरू केले. तसेच विद्यार्थांच्या मागणीनुसार व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत
. सन २००६ मध्ये पहिल्या नॅक मूल्यांकनामध्ये महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला. सन २००८-०९ मध्ये मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयाला "बेस्ट कॉलेज अवॉर्ड" देऊन सन्मानित केलं. "अविष्कार रिसर्च कन्वेन्शन " हा मुंबई विद्यापीठाचा संशोधनावर आधारलेला उपक्रम ज्यामध्ये राज्यातील सर्व म्हणजे जवळजवळ ८५० महाविद्यालये यात सहभागी होतात. २००९-१० मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात सलग नऊ वर्ष आपले महाविद्यालय चॅम्पियनशिप मिळवत आहे. त्यानंतर २०१२-१३ च्या शैक्षणिक वर्षांमध्ये पुन्हा एकदा महाविद्यालयाला मूल्यांकनामध्ये ‘अ’ दर्जा व २०१७-१८ मध्ये ‘अ+’ दर्जा प्राप्त झाला. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये युजीसीकडून "स्वायत्त" दर्जा महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. आजपर्यंत महाविद्यालयाने १५ पदवी, १४ पदव्युत्तर त्याचबरोबर ९ संशोधन विभाग सुरू केले आहेत. सांस्कृतिक विभागात आपल्या महाविद्यालयाचा मुंबई विद्यापीठात कायम दबदबा राहिलेला आहे. दरवर्षी मुंबई विद्यापीठात भरवल्या जाणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवात महाविद्यालय मोठ्या प्रमाणात यश संपादित करत आलेले आहे. त्याचप्रमाणे एन.सी.सी, एन.एस.एस चे विद्यार्थी आज अभूतपूर्व यश मिळवत आहेत. सलग दोन वेळा नवी दिल्ली येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावर होणाऱ्या आरडी परेडसाठी आपल्या महाविद्यालयाच्या एनसीसीच्या कॅडेट्सची निवड झाली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त पार्लमेंट मध्ये भाषण करण्यासाठी संपूर्ण भारतातून निवड केलेल्या सात विद्यार्थ्यांपैकी महाराष्ट्रातून निवड झालेली एकमेव विद्यार्थीनी कु. प्रिया चौधरी ही आपल्या महाविद्यालयाची होती. एकूण या वाटचालीत या महाविद्यालयाने अनेक सन्मान प्राप्त केली आहेत. त्यामुळे या समारंभाला विशेष महत्व आहे.
Tags
पनवेल