पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने केला श्रमजीवी महिलांचा सन्मान







महिला दिनाच्या औचित्याने केला संघर्ष माऊलींचा सत्कार

        सेवाभावी कार्यक्रम आणि अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी सुप्रसिद्ध असलेली पनवेल तालुका पत्रकार विकास मंच ही संस्था प्रामाणिक आणि सजग कार्यक्रम राबविण्याकरता ओळखली जाते. शनिवार दिनांक ११ मार्च रोजी जागतिक महिला दिनाच्या औचित्याने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने श्रमधरेची कास धरत संघर्षमय परिस्थितीत आपल्या संसारासाठी नेटाने व्यवसाय करणाऱ्या माऊलींचा सन्मान केला. अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमात श्रमजीवी महिलांचा शाल, सन्मानचिन्ह, आणि चांदीचे नाणे देऊन गौरव करण्यात आला.



        अर्धांग वायूचा झटका आल्यामुळे रोजगार-व्यवसाय करण्यास पती असमर्थ असताना जयश्री सुनील पनवेलकर ही माऊली परिस्थिती समोर झुकली नाही. माझ्याच्याने जेवढे होईल तेवढे करेन पण कोणापुढे हात पसरणार नाही असा बाणा ठेवत ही माऊली वडापावची गाडी चालवून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण नेटाने करत आहे. त्यांच्यातील या लढाऊ बाण्यासाठी मंचाने त्यांचा गौरव केला. पतीच्या निधनानंतर त्यांचा चप्पल दुरुस्तीचा व्यवसाय नेटाने सांभाळणाऱ्या ताराबाई बुरुडे या माऊलीची संघर्ष कहाणी देखील विलक्षण आहे.गेली २६ वर्षे चप्पल दुरुस्तीचे दुकान त्या चालवीत आहेत. हरिभक्त परायण असणाऱ्या ताराबाई यांच्या मुखात सदोदित विठू नामाचा गजर ऐकायला मिळतो. जितकी श्रद्धा पांडुरंगावर आहेत तितकीच श्रद्धा त्यांची त्यांच्या व्यवसायावर आहे. संघर्षमय परिस्थिती समोर न झुकणाऱ्या या माऊलीचा मंचाने यथोचित गौरव केला.




गेली सहा वर्षे अबोली रिक्षा चालक आशाताई दादासाहेब घालमे रिक्षा चालवत आहेत. रिक्षा चालक असणाऱ्या पतीच्या खांद्याला खांदा लावून त्या संसाराचा गाडा ओढतात. मुलांची स्वप्न पूर्ण करायची असतील तर पतीसोबत आपण देखील अर्थार्जनास हातभार लावला पाहिजे या उदात्त हेतूने ही माऊली रिक्षा चालवण्याचे काम अत्यंत खुबीने करत आहे.तर पतीच्या भाजीविक्री व्यवसायासोबतच आपण देखील श्रम करून संसारासाठी काही करावं या उदात्त विचारधारेने शुभांगी रामदास कावळे ही माऊली स्वयंपाकाची कामे घेत असतात. श्रमधरेची कास धरत वाटेल तितकी मेहनत करताना त्या जराही मागेपुढे पाहत नाहीत. पतीच्या खांद्याला खांदा लावत नेटाने व्यवसाय करणाऱ्या आशा घालमे आणि शुभांगी कावळे यांचा मंचाने सन्मान केला.



        याबाबत प्रतिक्रिया देताना अध्यक्ष माधव पाटील म्हणाले की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणारे कार्यक्रम दबकेबाज, भपकेबाज करण्याकडे आज-काल सगळ्यांचा कल दिसून येतो. परंतु आम्ही मात्र सन्मान करताना गरजवंत आणि संघर्ष योध्या ज्यांचा समाजाने आदर्श घेतला पाहिजे अशा महिलांची निवड केली. आज आम्ही अशा महिलांचा सन्मान केला ज्या समाजापुढे स्वकर्तृत्वातून एक स्वावलंबनाचा आदर्श वस्तूपाठ घालून देत आहेत.


      श्रमजीवी महिलांच्या सन्मान कार्यक्रमास अध्यक्ष माधव पाटील,सरचिटणीस मंदार दोंदे, उपाध्यक्ष हरेश साठे, खजिनदार नितीन फडकर,संजय कदम, अनिल कुरघोडे,मयूर तांबडे, प्रविण मोहोकर,राजू गाडे,योगेश पाटील, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक साप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने