पनवेल दि.२७ (वार्ताहर) : ट्रेलर चोरीप्रकरणी पनवेल तालुका पोलिसानी दोन आरोपींना गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा ट्रेलर हस्तगत केला आहे.
तालुक्यातील कोनगांव येथील नवकार कॉर्पोरेशन या ठिकाणी फिर्यादी यांनी उभा करून ठेवलेला टाटा कंपनीचा 18 चाकी ट्रेलर (एमएच 46 एच 3977) हा अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करून चोरी करून नेल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला होता. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, प्रकाश मेहेर, पोलीस शिपाई आकाश भगत आदींच्या पथकाने घटनास्थळापासून दुहेरी जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
यामध्ये सर्वप्रथम ट्रेलर हा आपटाफाटाच्या दिशेने पेण कडे निघाला. त्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्याच्या इराद्याने ट्रक पेणच्या दिशेने नेऊन ट्रेलरमधील जीपीआरएस काढून टाकला व यू-टर्न मारून पुन्हा उरण- न्हावाशेवा च्या दिशेने घेऊन गेला. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासादरम्यान पथकाला ट्रेलरच्या पुढे सातत्याने एक मोटरकार दिसून येत होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने मोटार कारचा क्रमांक प्राप्त केला. पथकाने मोटर कारच्या मालकाचा शोध घेऊन राकेश कुमार, (वय 37, रा. पंजाब) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला ट्रेलर तळोजा येथून जप्त करण्यात आला. आरोपीनी ट्रेलर ओळखी येऊ नये म्हणून त्यास नागालँड पासिंगचा क्रमांक लावून कलर केला होता. याघटनेतील दुसरा आरोपी राजकमल सिद्धू, (वय 35, रा. पंजाब) याचा शोध सुरू आहे.
Tags
पनवेल