पनवेल दि.२७ (वार्ताहर) : जागतिक जल दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज व जाणीव सामाजिक सेवा संस्थेने संयुक्तरित्या विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये 'चला जाणू या पाण्याला' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान, 'जल जाणीव' या विषयावर चित्रकला स्पर्धा, हौसिंग सोसायटीमधील घरांची कुशल प्लंबरव्दारे पाहणी, रिक्षांवर जल संदेशाचे स्टीकर्स तसेच जल जाणीव फेरी असे विविध कार्यक्रम आठवडाभर आयोजित करण्यात आले होते.
पाण्याचा एक थेंब हा सुद्धा खूप मोलाचा आहे, याची जाणीव नागरिकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे सेवानिवृत्त सह संचालक डॉ. सतीश उमरीकर यांनी 'चला जाणू या पाण्याला' या विषयावर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनतर ८वी व ९ वी च्या विदयार्थ्यांसाठी 'जल जाणीव' या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यांत आले होते. या स्पर्धेत १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच नवीन पनवेल व सुकापूर मधील तीन हौसिंग सोसायटी मधील सुमारे १७० फ्लॅटस मध्ये नळांव्दारे गळतीची कुशल प्लंबरव्दारे पहाणी करण्यात आली, ज्या ठिकाणी अशी गळती दिसून आली, ती गळती कोणतेही शुल्क न आकारता दुरुस्त करून देण्यांत आली. त्याचप्रमाणे जागतिक जलदिनी जलसाक्षरतेचे संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावेत यासाठी जल संदेशाचे स्टीकर्स पनवेल, नवीन पनवेल मधील रिक्षा नाक्यांवर जाऊन रिक्षांवर लावण्यात आली. तसेच जल जाणीव फेरीव्दारे नागरिकांना पाणी वाचविण्याचे, पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यासाठी एन एन पालीवाला कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसह नवीन पनवेलमध्ये जल जाणीव फेरीचे आयोजन करण्यात आले. या जल जाणीव फेरीत विद्यार्थी,त्यांचे शिक्षक वर्ग, जाणीव संस्थेचे व रोटरी क्लब ऑफ सनराइजचे सदस्य, त्यांचा परिवार तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते, कर्मचारी, संत रोहिदास मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे जागतिक जलदिनानिमित्त विद्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार सूर्यवंशी तसेच पालीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य हेमचंद्र दहीवदकर हे मुख्य अतिथी उपस्थित होते. सरस्वती पूजन आणि जल पूजन करून जल दिन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रोटरीचे सेक्रेटरी बाळकृष्ण आंबेकर यांनी प्रास्ताविक केल्यावर जाणीव संस्थेचे अध्यक्ष विजय गोरेगांवकर यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज करत पाण्याचे मोल सांगितले व जलसाक्षर नागरिक बनण्याचे आवाहन केले. उप प्राचार्य दहीवदकर यांनीही विद्यार्थ्यांनी या सामाजिक कामात सहभागी होण्यासाठी तसेच जलसंधारणेसाठी विविध भागात सामाजिक संस्थानी, व्यक्तींनी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी कार्यकारी अभियंता विजयकुमार सुर्यवंशी यांनी आपल्या नळ पाणी पुरवठा योजनेतून आपल्याला घरापर्यंत येणारे पाणी कसे येते, त्यासाठी किती मोठी प्रक्रिया असते, किती खर्च येतो, किती यंत्रणा राबत असते हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. असे सहज मिळणारे पाणी आपण खूप जपून वापरले पाहिजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पाणी, पाण्याचे वय, त्याचा वापर, भावी पिढीचा विचार याबाबत आपण गंभीर झाले पाहिजे याची त्यांनी विद्यार्थ्यांना जाणीव करून दिली. त्यानंतर 'जल जाणीव चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. दोन विद्यार्थ्यांनी जलदिनावर आपले मनोगत उत्स्फूर्तपणे सादर केले. त्यानंतर सर्वांनी जलप्रतिज्ञा घेतली. जाणीवचे सेक्रेटरी रुपेश यादव यांनी आभार व्यक्त केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास बांठीया विद्यालयाचे तसेच एन एन पालिवाला कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक,विद्यार्थी, रोटरी क्लब ऑफ पनवेलचे सदस्य, जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सदस्य, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते, कर्मचारी, इतर सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
पनवेल