अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली






पनवेल(प्रतिनिधी) नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खारघर सेक्टर १२ मधिल एका रो हाऊसवर छापा टाकून १ कोटी ७० लक्ष रूपयांचे गांजा, चरस, हेरॉईन व मेथाक्युलॉन हे अंमली पदार्थ दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी जप्त केले असून या प्रकरणी परदेशी नायजेरीयन नागरीकांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विक्री व्यवसायात परदेशी नायजेरीयन नागरीकांचा मोठया प्रमाणात सहभाग सातत्याने दिसून येत असून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी स्थानबध्दता केंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परदेशी तसेच व्हिसा संपलेल्या नागरीकांना त्यांच्या मुळ देशात परत पाठविण्याबाबत तसेच अंमली पदार्थांच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दाखल करून या महत्वाच्या विषयावर शासनाचे लक्ष केंद्रित केले. 



        उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी खारघर पोलीस ठाणे यांनी खारघर सेक्टर १२ येथील एका रो हाऊसवर छापा टाकून १ कोटी ७० हजार रुपये किंमतीचे गांजा, चरस, हेरॉईन, मेथ्याक्युलॉन हे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. सदर प्रकरणी दि. ३१.१२.२०२२ रोजी एन.डी.पी.एस. कायदा, १९८५ च्या कलम ८(क),२०(ब), २२(ब), २९ सह भा. दं.वि. कलम १४३, १४७, १४९, ३५३, ३४ सह पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम, १९५० च्या कलम ३ व ६ सह परदेशी नागरीक कायदा, १९४६ कलम १४ (अ) (ब) (क) अन्वये गु.र.क्र. ४१६/ २०२२ दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी एकूण १३ नायजेरीयन व ३ इतर देशातील नागरीकांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे. कारागृहातून शिक्षा भोगून मुक्त झालेल्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्यापूर्वी स्थानबध्द करण्यासाठी राज्यात तात्पुरत्या स्वरूपातील स्थानबद्धता केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. संबंधित पोलीस ठाण्यामार्फत गुन्हा दाखल करून शिक्षेचा कालावधी संपल्यावर अशा



 नागरीकांना त्यांच्या मूळ देशाच्या भारतातील उच्चायुक्त यांच्यामार्फत त्यांच्या देशात पाठविण्याची कार्यवाही करण्यात येते. राज्यात अंमली पदार्थांच्या व्यापारास व प्रसारास आळा घालण्यासाठी सर्व पोलीस घटकांमध्ये स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन केलेला आहे. तसेच अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना अंमली पदार्थाबाबतचे "समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्यामध्ये अॅन्टी नार्कोटीक्स टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. तसेच केंद्र शासनाच्या दि.२५.०३.२०२२ च्या आदेशानुसार अंमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी राज्यस्तरीय नार्को कोऑर्डिनेशन समिती व जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय नार्कोकोऑर्डनिशन समितीची स्थापना करण्यात आली असून सदर समित्यांकडून अंमली पदार्थांवर आळा घालण्याबाबत वेळोवेळी आढावा घेतला जातो.







थोडे नवीन जरा जुने