एल.बी पाटील यांचा रेल्वे स्टेशन समोर आत्महत्या करण्याचा इशारा.
सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सहभाग.
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )गेली 12 वर्षे सिडको आणि रेल्वे सोबत वारंवार पत्रव्यवहार आणि चर्चा करूनही उरण तालुक्यातील मौजे नवघर येथे रेल्वे स्टेशन असताना नवघर रेल्वे स्टेशन हे नाव न देता सदर रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा नाव दिल्याने महिला,मुले, पुरुष यांचा संतप्त मोर्चा रेल्वे स्टेशनवर नेण्यात आला होता. यावेळी सिडको प्रशासनाविरुध्द प्रचंड घोषणा देण्यात आल्या.
पुढील काही महिन्यांत रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन असे नाव न दिल्यास रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील हे रेल्वे समोर स्टेशनवर आत्महत्या करणार असल्याचा प्रशासनाला निर्वाणीचा जाहीर इशारा भर सभेत दिला.नवघर रेल्वे स्टेशन जवळ असलेला जिल्हा परिषदेचा रस्ता रेल्वे प्रशासनाने गिळंकृत केला आहे. नवघर ग्रामस्थांना रेल्वे प्रशासनाने अजूनही पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिलेला नाही. पर्यायी रस्ता नसल्याने 5 किलोमीटर फेरे घालून प्रवास करावा लागणार आहे.
प्रकल्पग्रस्त असलेल्या स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत प्राधान्य दिले गेले पाहिजे. पार्किंग, गाळे, स्टॉल, हाऊसकिपींग मध्ये मजूर सोसायटी किंवा महिला बचत गटाना प्राधान्य देऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. न्हावा शेवा गावाचा काहीच संबंध नसताना सदर रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात आले आहे. न्हावा शेवाचे नाव देण्यास आमचा विरोध आहे.
सदर रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे अशी मागणी या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी आपल्या भाषणातून केली.यावेळी कॉम्रेड भूषण पाटील,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,सरपंच सविता मढवी,उपसरपंच दिपक बंडा,गंधार पाटील,विश्वास तांडेल, समाधान तांडेल,मोहन भोईर,रंजना भोईर, अविनाश म्हात्रे,रत्नाकर पाटील,उषा बंडा यांनीही विचार मांडून प्रशासनावर टीका केली. यावेळी रवी वाजेकर ,महादेव बंडा ,योगेश तांडेल,भूमीत भगत,अजय पाटील, सुरेश भोईर,एम.डी.भोईर, कुंदन बंडा,कृष्णा ठाकूर,रवी भोईर,आशा पाटील, गणेश भोईर, ज्ञानेश्वर तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.गंधार पाटील यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.
मार्च महिन्याच्या अखेर पर्यंत उरण ते सीएसटी (मुंबई )रेल्वे सेवाही सुरू होणार आहे.सामाजिक कार्यकर्ते मर्मगंध पाटील, रायगड भूषण प्रा एल.बी. पाटील हे गेली 10 ते 12 वर्षापासून नवघर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशनला नवघर नाव देण्यात यावे यासाठी पाठपुरावा करत आहेत.
आता काही दिवसात रेल्वे सुरु होणार आहे मात्र नवघर गावा नजीक असलेल्या रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा रेल्वे स्टेशन असे नाव दिल्याने नवघर कुंडेगाव, नवघर पाडा ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. नवघर ग्रामपंचायत, ग्रामस्थ मंडळ, सिडको व रेल्वे प्रशासन यांच्या अनेक संयुक्त बैठका झाल्या. या बैठकीतही नवघर गावाजवळ असलेल्या रेल्वे स्टेशनला नवघर रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली.लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला , मात्र न्हावा शेवा गावाचा काडीमात्र संबंध नसताना नवघर येथील रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा रेल्वे स्टेशन असे नाव दिल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या संदर्भात 8/3/2023 रोजी नवघर ग्रामपंचायत, नवघर ग्रामस्थ मंडळ, ग्रामस्थ,जेष्ठ साहित्यिक एल. बी. पाटील यांनी तेथील रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेतली. नवघर येथील रेल्वे स्टेशनला न्हावा शेवा रेल्वे स्टेशन हे नाव न देता नवघर रेल्वे स्टेशन असे नाव देण्यात यावे अशी मागणी लेखी निवेदना द्वारे रेल्वे अधिकारी अविनाश सिंग यांच्याकडे करण्यात आली.
मागणी मान्य न झाल्यास सोमवार दि.13 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वा. रेल्वे स्टेशन समोरच तीव्र निदर्शने करण्याचा इशारा जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते एल. बी. पाटील यांनी रेल्वे प्रशासनाला दिला होता त्या अनुषंगाने दिनांक 13 मार्च 2023 रोजी रेल्वे स्टेशन वर तीव्र निदर्शने करण्यात आले .यावेळी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
उरण