मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्यांची नोंद इतिहासामध्ये बेईमान म्हणूनच होणार - कोंकण विभाग संपर्क नेते सुभाष देसाई




पनवेल दि.०४ (वार्ताहर) : आपल्या सर्वांच्या अस्मितेची ओळख असलेल्या मातोश्री बरोबर गद्दारी करणाऱ्या या ४० चोरांची नोंद इतिहासात बेईमान म्हणूनच होणार आहे. जे उद्धव साहेबांसह ठाकरे कुटुंबीयांसोबत आजही आहेत तेच खरे इमानदार म्हणून ओळखले जातील असा विश्वास कोंकण विभाग संपर्क नेते सुभाष देसाई यांनी आज पनवेल येथील शिवगर्जना मेळाव्यात व्यक्त केला.  



                 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे प्रमुख नेते संपूर्ण महाराष्ट्रात ४० गद्दारांविरोधात झंजावात दौरा करत आहेत. त्याअंतर्गत आज पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये सिंधी पंचायत हॉल, विश्राळी नाका, पनवेल येथे शिवगर्जना मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला प्रमुख व्यक्ते म्हणून कोंकण विभाग संपर्क नेते सुभाष देसाई यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, शिवसेना भवनचे निरीक्षक वैभव सावंत, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर संघटक शशिकांत डोंगरे, तालुका प्रमुख संदीप तांडेल, विश्वास पेटकर, ज्ञानेश्वर बडे, उद्योजक चेतन साळवी, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, जिल्हा समन्वयक नितीन पाटील, युवासेना पनवेल संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महिला आघाडी उपजिल्हा संघटीका सौ. कल्पना पाटील, विधानसभा संघटीका सौ. रेवती सकपाळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. 


यावेळी बोलताना कोंकण विभाग संपर्क नेते सुभाष देसाई यांनी सांगितले कि, कितीही संघर्ष करावा लागला तरीही शिवसैनिक मागे हटणार नाही. कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे भाजपला त्यांची जागा कळली आहे. आता कधीही निवडणूक लागल्या तरी महाविकास आघाडी व या महागाईने त्रस्त झालेली जनता भाजप व मिंधे गटाला कायमचे घरी बसवेल परंतु पोटनिवडणुकीच्या निकालाने घाबरलेल्या मिंधे सरकार आता लवकर निवडणूक घेण्याची शक्यता कमी आहे. निवडणूका कधीही लागोत आपला विजय निश्चित आहे व उद्धव ठाकरेंना आपल्याला पुन्हा मुख्यमंत्री बनवायचे आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर भाजपने पनवेलकरांवर लादलेला मालमत्ता कर हा कमी किंवा कायमचा माफ करू असे त्यांनी यावेळी घोषित केले. तर यावेळी बोलताना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी सांगितले कि, २-४ गद्दार सोडता आज प्रामाणिक व कट्टर शिवसैनिक आपल्या समोर बसला आहे. अत्यंत कठीण समय ठाकरे कुटुंबियांवर आला असताना पनवेलसह रायगडचा शिवसैनिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही शिवगर्जना मेळाव्याच्या निमित्ताने बबनदादा पाटील दिली.


 भाजपप्रणीत पनवेल महानगरपालिका हि लोकांवर नाहक मालमत्ता कर लादत आहे याला विरोध करण्यासाठी पनवेल महानगरपालिके विरोधात महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा येत्या १३ मार्च रोजी काढून भाजप सरकारच्या अनागोंदी कारभार विरोधात रोष व्यक्त केला जाणार आहे अशी माहिती बबनदादा पाटील यांनी देऊन सर्व पनवेलकरांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले. तसेच जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सुद्धा आपल्या तडाखेबाज भाषणात मिंधे सरकारचे वाभाडे काढताना सांगितले कि, जे संघटनेतून सोडून गेलेत ते कावळे तर जे आपल्यासमोर बसलेले आहेत ते खरे मावळे आहेत. हेच मावळे शिवसेनेला पुन्हा उभारी देणार आहेत यात तिळमात्र शंका नाही. महाराष्ट्रातील भरभराटीला असलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्याचे काम या मिंधे सरकारने केले आहे. याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. हे औट घटकेचे सरकार जास्त काळ टिकणार नाही व पुन्हा एकदा महाराष्ट्रात भगवा फडकेल असा विश्वास शिरीष घरत यांनी व्यक्त केला. यामेळाव्यात आलेल्या शिवसैनिकांनी जय भवानी… जय शिवाजी.. , शिवसेनाप्रमुख जिंदाबाद, उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद अश्या जोरदार घोषणाबाजी करून अवघा परिसर दुमदुमला होता.


थोडे नवीन जरा जुने