पनवेल मनपाच्या अत्याधुनिक स्वच्छता वाहनांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण






पनवेल (प्रतिनिधी) सिडको प्रशासनाकडून मलनिस्सारण वाहिन्यांचे हस्तांतरण झाल्यानंतर पनवेल महापालिकेने स्वच्छतेसह नागरिकांचे आरोग्य निकोप राहण्याकरिता महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. महापालिकेच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन दाखल झाल्या आहेत. या वाहनांचे लोकार्पण भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते  करण्यात आले. विशेष म्हणजे या मशिनमधून केल्या जाणार्‍या साफसफाईतून जमा होणारे पाणी पुन्हा वापरात येणार असल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.


           पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील मलनि:स्सारण वाहिन्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी १० हजार ५०० लिटर क्षमतेच्या दोन रिसायकलर सिवर संक्शन कम जेटींग मशिन खरेदी करण्यात आल्या आहेत. मलनिस्सारण विभागातील ही सर्वांत अत्याधुनिक वाहने असून या वाहनांमुळे मलनिस्सारण वाहिन्यांची साफसफाई अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे.


 या वाहनांमध्ये हायड्रॉलिक व्हॅक्यूम, हाय प्रेशर-हाय फ्लो वॉटर जेटिंग पंप तसेच सुरक्षितता अशा बाबी अंतर्भूत आहेत. या वाहनाच्या टाकीतील जमा झालेल्या गाळाची विल्हेवाट इच्छित स्थळी नेऊन गुरुत्वाकर्षण, प्रेशर डिस्चार्जद्वारे केली जाणार आहे, तर यामधील खराब पाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याची व्यवस्थाही या वाहनांमध्ये आहे. यामुळे साफसफाईतून जमा होणारे पाणी पुन्हा वापरात येईल. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. ही मशीन उपलब्ध झाल्याने मलनिस्सारण वाहिन्यांची साफसफाई करण्याकरिता महापालिकेकडे सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. या वाहनांच्या लोकार्पणावेळी महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते



थोडे नवीन जरा जुने