पनवेल दि . २८ ( वार्ताहर ) : कळंबोली येथे भाड्याच्या प्रतीक्षेत कारमध्ये झोपी गेलेल्या एका उबेरचालकावर दोघा लुटारूंनी स्क्रू ड्रायव्हरने वार करून त्याचा मोबाईल फोन व रोख रक्कम लुटल्याची घटना पहाटे घडली असून कळंबोली पोलिसांनी या घटनेतील दोघा लुटारूंविरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
या घटनेतील जखमी उबेर चालकाचे नाव अबु बक्कर ताहेजअली सिद्धिकी असे आहे. अबु हा उबेरची कार चालवत असून, त्याने कारमध्ये घाटकोपर येथून खारघरचे भाडे घेतले होते. त्या प्रवाशाला खारघर येथे सोडल्यानंतर अबु कळंबोली ब्रीज जवळील पंपावर सीएनजी भरण्यासाठी गेला होता. त्यानंतर अबु हा रात्री गाडीतच झोपी गेला. पहाटे साडेचारच्या सुमारास त्याच्या कारजवळ आलेल्या दोघा लुटारूंनी कारची काच वाजवल्यामुळे अबूने दरवाजा उघडला.
त्यानंतर लुटारूंनी अबुला लुटण्यासाठी मारहाण केली. लुटारूंनी त्याच्याकडे पर्स मागण्यास सुरुवात केली असता अबुने लुटारूंचा प्रतिकार केला. त्यामुळे लुटारूने अबुच्या डोक्यात दगड मारला. तर दुसऱ्या लुटारूने अबूच्या पाठीत वार करून त्याला जखमी केले.व त्यानंतर त्याच्या खिशातील मोबाईल फोन व रोख रक्कम लुटून ते पसार झाले . या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Tags
पनवेल