पनवेल परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकाऱ्यांचा वाढता वावर







पनवेल परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकाऱ्यांचा वाढता वावर
पनवेल दि.१२ (संजय कदम) : पनवेल परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकाऱ्यांचा वावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, डॉ नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल, दुर्गामाता मंदिर, साईबाबा मंदिर, कळंबोली सर्कल व दर्गा परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकाऱ्यांचा वास्तव्यास वाढत आहे. मुख्यतः ते गर्दुल्ले परप्रांतीय असल्याने वाढत्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



                पनवेल परिसरातील पनवेल रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, डॉ नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूल, दुर्गामाता मंदिर, साईबाबा मंदिर, कळंबोली सर्कल व दर्गा परिसरात गर्दुल्ल्यांसह भिकाऱ्यांचा वास्तव्यास वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर झाली आहे. यामध्ये कडेवर मूल घेऊन सर्वत्र फिरणाऱ्या महिला जास्‍त दिसून आल्‍या. पनवेल रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात हे भिकारी प्रवाशांचे कपडे पकडणे, हात पकडणे, पाया पडणे असे प्रकार करतात आणि पैसे देण्यास भाग पाडतात. स्थानकात तिकीटघराजवळही असाच प्रकार सुरू असतो.



 तर संध्याकाळी कार्यालयातून घरी जाणाऱ्या प्रवाशांचा स्थानकाबाहेरील बसस्थानक व रिक्षाथांब्यापर्यंत पिच्छा पुरवला जातो. त्याचप्रमाणे शहरातील इतर परिसरात दिवसभर भीक मागायची, जे मिळेल ते अन्न खायचे आणि रात्री डॉ नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखाली आसरा घ्यायचा तर अनेकांनी पनवेल रेल्वे स्थानकाहून तक्का भागात जाणाऱ्या रस्त्यावरील उघड्या प्लॉट व फुटपाथवरच बेकायदेशीर झोपड्या उभारल्या आहेत. येथे रात्री सर्व एकत्र येऊन सर्व विधी उघडयावर करण्याचा किळसवाणा प्रकार करतात. तसेच रात्री स्त्री-पुरुष दोघेही नशेत भांडणे करताना दिसून येतात. तर लहान बालके उघड्यावरच फिरत असतात. त्याचप्रमाणे या परिसरातून जाणाऱ्या प्रवाश्यांना लुटण्याचा प्रकार सुद्धा समोर आले आहेत. 



या रस्त्यावरून येणाऱ्या प्रवाश्यांना एकटे बघून त्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे व अन्य मौल्यवान वस्तू हिसकावून घेतात. त्यामुळे त्या भागातून ये-जा करणाऱ्या स्थानिक रहिवाश्यांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. तसेच डॉ नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलावरील दुभाजकावर सुद्धा हे भिकारी-गर्दुल्ले झोपत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यातील बहुसंख्य लोक परप्रांतीय असल्याने वाढत्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्यावर लवकरात लवकर आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



थोडे नवीन जरा जुने