भाजपा -शिवसेनेतर्फे राज्यव्यापी सावरकर गौरव यात्रा; ०२ एप्रिलला पनवेल विभागात सावरकर गौरव यात्रा


 - 



भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची माहिती 
पनवेल(प्रतिनिधी) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी राज्यभरात ३० मार्च पासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे, त्यानुसार ०२ एप्रिलला पनवेल परिसरात हि गौरव यात्रा होणार असल्याची माहिती भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (दि. २९ मार्च ) येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरात ३० मार्च पासून यात्रेला प्रारंभ होणार असून ही यात्रा ६ एप्रिल पर्यंत चालणार आहे. आणि या यात्रेतून नव्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.


मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे महानगरप्रमुख रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, प्रवक्ते प्रकाश बिनेदार, रायगड जिल्हा विस्तारक अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, माजी खारघर शहर भाजपचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा वर्षा नाईक, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सुहासिनी केकाणे, सपना पाटील, अंजली इनामदार आदी पदाधिकाऱ्यांसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढे माहिती देताना सांगितले कि, राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सावरकर गौरव यात्रा प्रवास करणार आहे. ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनी या यात्रेचा समारोप होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपा - शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्या अनुषंगाने रविवार दिनांक ०२ एप्रिल रोजी पनवेल परिसरात हि गौरव यात्रा होणार असून खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल या भागात हि यात्रा गौरव रथाचा सहभाग घेऊन होणार आहे. 



 काँग्रेसनेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान सत्ता टिकवण्यासाठी निमूटपणे सहन केला तसेच सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडून दिला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला रस्त्यावर उतरून जोडे मारले होते. तशी हिंमत उद्धव ठाकरेंनी दाखवायला हवी होती, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी म्हंटले.


भारतवर्षाला परंपरा आहे. त्या अनुषंगाने सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या उद्दिष्ठाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश पुढे चालला आहे. आपल्या संस्कृतीचे महत्व जगात आहे. चीनला टक्कर देण्याची ताकद आपल्याकडे आहे आणि पाकिस्तानची तर आपल्या देशाकडे वाकडे पाहण्याची आता हिंमत नाही. अशा या आपल्या देशाचा गौरव जगभरात होत असताना काँग्रेसनेते राहुल गांधी मात्र परदेशात आपल्या देशाच्या विरोधात बोलतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशासाठी संघर्ष केला. दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा अंदमान येथे तुरुंगवास काळ्यापाण्याची शिक्षा भोगली, त्याग केला, संघर्ष केला, त्यांच्या जाज्वल देशभक्तीचा कुणीच चॅलेंज करू शकत नाही. त्यांची देशभक्ती आणि कार्याविषयी विरोधकांकडून जाणीवपूर्वक संशय निर्माण केले जात आहे आणि हे हाणून पाडण्यासाठी महाराष्ट्राची आणि देशाची अस्मिता असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्व अधिक वृद्धिंगत करण्यासाठी या गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विविध संस्था, संघटना, सार्वजनिक उत्सव मंडळ, पत्रकार, नागरिकांनीही सहभाग घ्यावा, असेही आवाहन यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

 






थोडे नवीन जरा जुने