फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर उरण तर्फे लहानग्यांसाठी सीड बॉल्स उपक्रम







फ्रेंड्स ऑफ नेचर चिरनेर उरण तर्फे लहानग्यांसाठी सीड बॉल्स उपक्रम
उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
फ्रेंड्स ऑफ नेचर (FON)च्या सृष्टी वृक्ष बँक मध्ये जमा झालेल्या काही बियांचे रोपटे बनविण्यात आले आहेत.लहान मुलांना सोबत घेऊन श्री बापूजी देव मंदिर, कोप्रोली येथे लहानग्यांसाठी सीड बॉल्स निर्मिती हा उपक्रम संस्थेच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमातून जवळपास ६४२ सीड बॉल्स बनविण्यात आले.



जमिनीतली पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर एकमेव उपाय म्हणजे झाडे लावणे. झाड लावणे तसे कंटाळवाणे काम पण बिजांचे गोळे तयार करून ते आसपासच्या परिसरात फेकले तर वनीकरणाबरोबर आनंद, मजा आणि पिकनिकही होईल आणि जमीन ही वनसंपदेने सजली जाईल.



प्रतिकूल परिस्थितीत वनीकरणाचा विचार रुजवायचा असेल तर त्यासाठीची पद्धतीही बदलावी लागणार आहे. त्याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांत बियांची रुजवात करण्यासाठी ’सीड बॉल्स’ ही अत्यंत सोपी, स्वस्त आणि उपयुक्त संकल्पना वापरली जाते आहे. यात लाल माती, काळी माती आणि शेणखताचा वापर करत गोळे बनवले जातात. त्यात जांभूळ, आवळा, भोकरे, अमलताश, करंज, चिंच, फणस, आंबा अशा विविध झाडांच्या बिया खोवल्या जातात.



 हे सीड बॉल्स पावसाळ्यात त्यातल्या बिया आणि पर्यावरणासाठी अत्यंत पोषक ठरतात. बाहेर कडाक्याचं ऊन आणि तोंडावर आलेला पावसाळा असा हा काळ सीडबॉल्स बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे. एकदा पावसाळा सुरू झाला की, तयार केलेले सीडबॉल्स घेऊन वनीकरणाच्या मोहीमेवर निघता येतं. हे गोळे निश्चित केलेल्या ठिकाणी दूरवरुन फेकून दिले तरीही चालतात.




 शेणमातीच्या मिश्रणामुळे ते फुटत नाहीत.दोन-चार सलग झालेल्या पावसामुळे मातीत ओलावा असल्याने हे सीडबॉल्स मातीतला ओलावा शोषून घेत मातीशी एकजीव होतात. शेणखताचे पोषण, मातीचा ओलावा यामुळे ’सीड बॉल’ मधील बिया पटकन रुजतात. ’सीड बॉल्स’ च्या माध्यमातून वृक्षारोपणाच्या मोहीमांना आता अधिक महत्त्व प्राप्त झालंय. त्यातही अवघ्या मानवजातीला बेजार करुन सोडलेल्या कोरोना विषाणूने ऑक्सिजनचं महत्त्व चांगलंच पटवून दिलंय. 




प्रत्येक श्वास किती महत्त्वाचा आणि आणि ऑक्सिजन मिळवण्यासाठी किती खटाटोप करावा लागतो, हेही अनेकांनी पाहिलंय. त्यामुळे ऑक्सिजन देणार्‍या झाडांसह अन्य झाडांच्या लागवडीसाठी पुढे येणार्‍या हातांची संख्या प्रचंड वाढेल. वृक्षारोपणाच्या मोहीमांनाही बहर येईल. मात्र, हे उपक्रम केवळ आरंभशूर नकोत. त्यात सातत्य राहिले तरच वनसंपदा वाढून पर्यावरणाचा समतोल कायम राहण्यास मदत होईल.





फ्रेंड्स ऑफ नेचर, सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर - उरण, जि- रायगड ही गेली १७ वर्षे रायगड मध्ये निसर्ग रक्षण चळवळीत सहभागी असून उत्तम काम करतेय. अश्या नवनवीन संकल्पना व प्रयोग लोकांसमोर मांडून त्यांच्या मनात व भावी पिढीला वृक्षारोपणाचे महत्त्व अंकुरित करण्याचे काम शुद्ध हेतूने करीत आहे.या प्रकल्पासाठी संस्थेचे सचिव शेखर अंकुश म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली. सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर, प्रणव गावंड, हृषिकेश म्हात्रे आणि निकेतन ठाकूर यांनी मुलांना सीड बॉल्स निर्मिती साठी काय करावे यासाठीचे मार्गदर्शन केले.


थोडे नवीन जरा जुने