पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई


पनवेल महानगरपालिकेची अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई
पनवेल दि ०९ (संजय कदम) : पनवेल शहरात पदपथ आणि रस्ते अडवून व्यवसाय करणार्‍या अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेने धडक कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच पालिकेने अशीच कारवाई सुरु ठेवावी अशी मागणी केली आहे.             पनवेल शहरातील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. फेरीवाल्यांसाठी भूखंड उपलब्ध करूनदेखील बहुतांश फेरीवाले पदपथ अडवून व्यवसाय करीत आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले आहेत. या वेळी फेरीवाले व्यवसायासाठी वापरत असलेल्या हातगाड्या तसेच बांबू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.


 तसेच काही ठिकाणी या फेरीवाल्यांनी अनधिकृतपणे पेटारा बनवून त्यामध्ये आपले साहित्य ठेवले होते. महापालिका अतिक्रमण पथकाने या पेटाऱ्यांना तोडून टाकत आतमधील साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे अश्याप्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच पालिकेने अशीच कारवाई सुरु ठेवावी अशी मागणी केली आहे. थोडे नवीन जरा जुने