वरद कलारंगातून आनंदी रंगांची उधळण ;
वरद कलारंगातून आनंदी रंगांची उधळण ;16व्या वर्षी वरद खुशाली विलासचे पहिले चित्र प्रदर्शन 

उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )सेंट मेरीज्॒ जे एन पी स्कूल मधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी वरद खुशाली विलास यांनी वरद कला रंग - रंग आनंदाचे अंतर्गत चित्रांचे प्रदर्शन जेएनपीटी - उरण मधील मल्टीपर्पज हॉल मध्ये भरविण्यात आले होते .प्रदर्शनाचे उद्घाटन जेएनपीटी चे विश्वस्त कॉ. भूषण पाटील व सर्वोदयी कार्यकर्ते विजय दिवाण यांच्या हस्ते झाले . या प्रदर्शनाला नीला आपटे, सुधाकर पाटील, एकनाथ ठाकुर, संतोष पवार, बिपिन पिसाट, एल. बी. पाटील, गोपाल पाटील, रमाकांत गावंड, संदीप पाटील, भरत मढवी, किशोर पाटील, रुपेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते, दोन दिवसातील प्रदर्शनात व्यक्तिचित्र, संगीत, प्रेम, करुणा, भक्तीरस, आणि निसर्ग अश्या विविध विषयातील चित्र पाहण्यासाठी. उरण , पनवेल, पेण मधील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, विविध शाळांतील शिक्षक, विद्यार्थी आणि कलाप्रेमी नागरिकांनी भेट देऊन रंगाच्या दुनियेतील सफर केली. वरदच्या चिमुकल्या हातातून निर्माण झालेल्या चित्रांचा जणू दोन दिवस उत्सव पाहावयास मिळाला. या अगोदर वरद खुशाली विलास या विद्यार्थ्याने वयाच्या 13 व्या वर्षी कोरोंना काळातील सक्तीच्या शालेय सुट्टीत 50 स्वातंत्र्य सैनिकांची तसेच ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मे यांची चित्र रेखाटली होती.    इयत्ता दहावीतील विद्यार्थीच्या हातून एकल प्रदर्शनाची ही तालुक्यातील पहिलीच वेळ होती, कमी वयात एवढी प्रचंड प्रतिभा शक्ति वरदच्या चित्रातून जाणवत होती, वासुदेवाच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव, छत्रपती शिवाजी महाराजांचा निर्भीडपणा व जिद्द, बुद्धाची करुणा, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर ही व्यक्तिचित्रे पाहताना रसिक वरदला चांगलीच दाद देत होते, व्यक्तिचित्रासोबत पक्षाची दुनिया निसर्गातील भटकंतीची ओढ वाढवीत होते, तर रंगीत फुलपाखरे मनाला मुक्त वातावरणातून फेरफटका मारून आल्याचा आनंद देत होती. प्रदर्शन भेटीदरम्यानच्या अभिप्रायांनी वरदच्या मनावर आनंदी रंगांचे शहारे आले.


थोडे नवीन जरा जुने