पनवेल दि. २३ (संजय कदम) : पनवेल परिसरात गेल्या काही दिवसांपासून उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करण्याचा प्रकार वाढला असल्याने पनवेल तालुका पोलिसांचे पथक मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर गस्त घालत असताना उभ्या ट्रकमधून डिझेल चोरी करणाऱ्या चौकडीपैकी एका सराईत चोरट्यास या पथकाने ताब्यात घेतले आहे.
पनवेल परिसरासह नवी मुंबई, खालापूर, दांडफाटा, जुना मुंबई पुणे महामार्ग, एक्सप्रेसवे महामार्ग, पनवेल-पेण महामार्ग या ठिकाणी रस्त्यांवर, हॉटेल समोर व ढाब्यांवर उभ्या असलेल्या वाहनातून डिझेल चोरी करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, पोलीस नाईक पाटील व पोलीस शिपाई आकाश भगत, पोलीस शिपाई मासाळ आदींचे पथक एक्सप्रेस मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधून काही व्यक्ती डिझेल चोरून पसार होण्याच्या तयारीत असताना या पथकाने धावत जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला
असता त्यामध्ये इतर तिघेजण त्यांच्याजवळ असलेल्या स्विफ्ट गाडीतून चोरीच्या डिझेलसह पसार झाले तर त्यांचा एक साथीदार महादेव उर्फ महादू सत्य गौडा (वय ३७, रा.कोपरखैरणे) याला ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. त्याच्या अटकेमुळे पनवेल परिसरात झालेले डिझेलचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दांडफाटा-खालापूर हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल चोरीचे रॅकेट सुरु असून पोलिसांनी आता त्याठिकाणी लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे.
Tags
पनवेल