अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला तळोजे भागातून अटक; लाखोंचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला तळोजे भागातून अटक; लाखोंचे अमली पदार्थ जप्त
पनवेल दि.१ (वार्ताहर) : पासपोर्ट व व्हिसाशिवाय तळोजा भागात बेकायदेशीरीत्या वास्तव्यास असलेल्या व छुप्या पद्धतीने अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या बोनिफेस ईमेनिके (४५) या नायजेरियन नागरिकाला नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा भागातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून ११ लाख ६० हजार रुपये किमतीचा ११६ ग्रॅम वजनाचा (एमडी) मेथाक्युलॉनचा साठा जप्त केला.
                         तळोजा सेक्टर-२ मधील श्रीकृपा रेसिडेन्सी इमारतीत राहणारा नायजेरियन नागरिक हा येथे एमडी या अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी कक्षाचे व.पो. नि. बी. एस. सय्यद व त्यांच्या पथकाने येथे छापा मारला. यावेळी बोनिफेस इमेनिके हा झटापट करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याजवळ असलेली प्लास्टिकची पिशवी तपासली असता त्यात मेथाक्युलॉन या अमली पदार्थाचा साठा आढळला. पोलिसांनी हा साठा जप्त केला. पोलिसांच्या चौकशीत त्याने हा साठा ओग्बोना पॉल या दुसऱ्या एका नायजेरियन व्यक्तीकडून घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच त्याच्याकडे पासपोर्ट व व्हिसा नसताना तो गेल्या ३-४ महिन्यांपासून येथे वास्तव्य करून अमली पदार्थाची विक्री करत होता, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी बोनिफेस ईमेनिकेविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.


 बोनिफेस ईमेनिके या नायजेरीयन नागरिकाला वर्षभरापूर्वी ठाणे पोलिसांनी मुंब्रा येथून अमली पदार्थाच्या तस्करीत अटक केली होती. तो काही महिन्यांपूर्वीच कारागृहातून सुटला आहे. त्याने पुन्हा तळोजा येथून अमली पदार्थाच्या तस्करीला सुरुवात केली होती. याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला एमडी या अमली पदार्थासह अटक करण्यात आली असल्याची माहिती व.पो.नि. सय्यद यांनी दिली.थोडे नवीन जरा जुने