युट्युबच्या लाइकवरून पैसे कमावण्याच्या नादात गमावले साडेदहा लाख


युट्युबच्या लाइकवरून पैसे कमावण्याच्या नादात गमावले साडेदहा लाख
पनवेल दि.१ (वार्ताहर) : युट्यूबवरील लिंक लाईक केल्यास त्या बदल्यास पैसे देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने नवीन पनवेलमध्ये राहणाऱ्या शांतीभूषण उपाध्याय यांची १० लाख ५२ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


             नवीन पनवेल, सेक्टर- ११ येथे राहणारे शांतीभूषण यांना एका मोबाईलवरून संदेश आला होता. यात युट्यूब लिंक पाठवून त्यावरील व्हिडीओ लाईक केल्यास प्रत्येक लाईक्सला ५० रुपये मिळतात व व्हिडीओ लाईक करून स्क्रीनशॉट पाठवून दिल्यास ही रक्कम दिली जाते, असे सांगण्यात आले होते. त्यावर उपाध्याय यांनी संपर्क केला असता, समोरच्या व्यक्तीने उपाध्याय यांची वैयक्तिक माहिती तसेच त्यांचे खाते असलेल्या बँकेची माहिती जाणून घेतली. सुरुवातीला त्याने गुगल पे खात्यावर ३०० रुपयांची रक्कम पाठवली. एप्रिल महिन्यात उपाध्याय यांनी टास्क टेलिग्राम ग्रुपवर एक खेळ खेळण्यास सुरुवात केली. यात त्यांना तीन टास्क दिले व तीन लिंक बनवले होते. टास्क पूर्ण झाल्यावर त्यांच्या बँक खात्यावर १५० रुपये प्राप्त पाठवण्यात आले होते. त्यानंतर यादीतील एक रक्कम निवडण्यास सांगितली व त्यांनी ३ हजार रुपये रक्कम ट्रान्सफर केली. अशा प्रकारे काही वेळा उपाध्याय यांच्या खात्यात त्यांनी किरकोळ रक्कम पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुढील टास्कसाठी उपाध्याय यांना १० लाख ५२ हजार रुपये भरण्यास सांगितले. उपाध्याय यांनी पैसे भरले. मात्र, या वेळी ही रक्कम ते गमावून बसले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उपाध्याय यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.


थोडे नवीन जरा जुने