आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्र


आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्र 

महाराष्ट्र राज्यात विशेषतः पनवेल तालुक्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्र व दाखल्यांची पुर्तता करण्यात होणाऱ्या अडचणी दुर करण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे शालेय मंत्री दीपक केसरकर यांना पत्राद्वारे केली आहे.       आरटीई प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रे व दाखल्यांची पुर्तता करण्याबाबत होणारी पालकांची अडचण लक्षात घेता या समस्येवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे कि, महाराष्ट्र राज्यात विशेषतः पनवेल तालुक्यातील आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 


शासकीय संपामुळे व इतर साप्ताहिक सुट्टया असल्याने शासकीय कार्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्याच्या पालकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या विहीत मुदतीत दाखले न मिळाल्यामुळे जवळपास पनवेल तालुक्यातील ३०० ते ४०० पात्र विद्यार्थ्यांचे दाखल्यांअभावी प्रवेश होणार नाही. तसेच उत्पन्नाचा व जातीचा दाखला दि. २५ मार्च २०२३ नंतरचे ग्राहय धरले जाणार नसल्याचे गटशिक्षणाधिकारी, पनवेल पंचायत समिती यांचे म्हणणे आहे.


 तसेच आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार असल्याच्या आशेवर असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांनी दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रयत्न केला नाही. त्यामुळे आजमितीला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळणे कठिण होणार आहे. त्यामुळे आरटीई पात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत दि. २५ मार्च २०२३ तारखेबाबत निर्माण होणारी अडचण दूर करावी, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पत्रात नमूद केले आहे. थोडे नवीन जरा जुने