आदिवासी व्यक्तीची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बिगर आदिवासी व्यक्तींनी हडपल्या बद्दल अट्रोसिटी कायद्या अंतर्गत उरण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल







आदिवासी व्यक्तीची जमीन बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने बिगर आदिवासी व्यक्तींनी हडपल्या बद्दल अट्रोसिटी कायद्या अंतर्गत उरण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल



कातकरी आडनाव असलेल्या आदिवासी व्यक्तीचे वारस नोंद करताना आगरी समाजाचे घरत आडनाव असलेल्या व्यक्तींची नावे लावण्याचा महसूल विभागाचा अजब चमत्कार
मौजे दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 आणि 100/1 ह्या कोट्यवधी रुपयांच्या पाच एकर आदिवासी खातेदाराच्या जमिनी बाबत हा भयानक प्रकार उघडकीस



उरण सामाजिक संस्थेने केली सर्वतोपरी मदतउरण दि 10(विठ्ठल ममताबादे )
मौजे दिघोडे तालुका उरण येथील.सर्व्हे नंबर 94/8 आणि 100/1 ही पाच एकर जमीन मिळकत गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या नावे सात बारा सदरी होती. सदर जमीन अनेक वर्षांपासून कातकरी कुटुंब कसत होते. परंतु सन 1980 मध्ये गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या मृत्यू नंतर सदरहू जमीन मिळकतीच्या सात बारा सदरी वारस नोंद होताना त्यांचीं तीन अपत्ये (मुले ) पोश्या, लक्ष्मण आणि पांडुरंग यांची नावे दाखल होणे गरजेचे होते परंतु सन 1983 मध्ये तुळशीराम बाबू घरत, लहू बाबू घरत, अंकुश बाबू घरत, भरत बाबू घरत यांनी तत्कालीन तलाठी



, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संगनमताने फेरफार क्र 1283 अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी यांचे वारस म्हणून आगरी समाजाचे वरील चार घरत कुटुंबीय यांची नावे सात बारा सदरी दाखल केली आणि ती आदिवासी खातेदारांची पाच एकर जमीन मिळकत गैर मार्गाने फसवणूक करून आपल्या नावावर करून घेतली. सन 1995 पर्यंत कातकरी कुटुंब सदरहू जमीन कसत होते. घरत कुटुंबीयांनी सदरहू पाच एकर जमीन सन 1996 मध्ये कैलास सदाशिव सुर्वे यांना नोंदणीकृत खरेदी खताने विकली. कैलास सदाशिव सुर्वे यांनी त्या जागेचा कब्जा घेवून जागेवर कुंपण घालून कंटेनर यार्ड सुरू करून व्यवसाय सुरू केला आणि त्यावेळेस आदिवासी कुटुंबाला त्या जागेवरून निष्कासित करण्यात आले. सन 2019 मध्ये जिल्हाधिकारी रायगड यांची कोणतीही परवानगी न घेता कैलास सदाशिव सुर्वे यांनी तत्कालीन तहसिलदार कल्पना गोडे यांनी संगनमताने सदरहू जमीन बिनशेती केली.


 आदिवासी खातेदारांची जमीन कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करायचे असल्यास शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असते, ह्या जमीन मिळकती च्या हस्तांतरण संदर्भात कोणतीही परवानगी घेतली नाही. गोपाळ लहाण्या कातकरी यांची नात मुक्ता अनंता कातकरी यांनी ह्या विषयी प्रथम उरण सामाजिक संस्थेकडे मदत मागितली. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय अधिकारी यांच्या कोर्टात फेरफार पुनर्विलोकन अपील दाखल केले. 




उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके यांनी सदर केस गुणवत्तेवर चालवून अंतिम निर्णयापर्यंत ठेवली. त्यावर कैलास सदाशिव सुर्वे यांनी महसूल मंत्री न्यायालयात दाद मागितली. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील गुणवत्तेवर सदरह अपील अंतिम निर्णयावर ठेवले. न्याय मिळण्यासाठी विलंब होवू लागल्याने मुक्ता कातकरी यांनी शेवटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याचे ठरविले. ॲड सिद्धार्थ इंगळे यांनी कायदेशीर बाजू सांभाळली. 


पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, न्हावा शेवा बंदर विभागचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे आणि पोलीस उप निरीक्षक सोनवणे, श्री कोळी, श्री गायकवाड यांनी कातकरी महिलेची बाजू समजावून घेतली आणि दिनांक 08/05/2023 रोजी अट्रोसिटी कायद्या अंतर्गत घरत कुटुंबीय, कैलास सदाशिव सुर्वे आणि महसूल कर्मचारी यांच्या विरोधात अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे

. हे प्रकरण हाताळताना कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, उप विभागीय अधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार पनवेल विजय तळेकर, माजी तहसीलदार उरण भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार उरण श्री कदम, नायब तहसिलदार नरेश पेडवी, निवासी तहसीलदार श्री धुमाळ यांनी विशेष सहकार्य केले.



थोडे नवीन जरा जुने