महापालिकेची अतिक्रमण कारवाई थांबताच परप्रांतीय नारळवाल्यांचा पुन्हा जागेवर बस्तान






महापालिकेची अतिक्रमण कारवाई थांबताच परप्रांतीय नारळवाल्यांचा पुन्हा जागेवर बस्तान
पनवेल दि.१५ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेने नुकतीच बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात जोरदार कारवाई करत त्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र कारवाई थांबताच या परप्रांतीय फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान त्या जागेवर बसवले आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेने या फेरीवाल्यांवर कायमची कारवाई करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. 



         पनवेल शहरातील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. अनधिकृत फेरीवाल्यांवर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी अनेक राजकीय, सामाजिक संघटनांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली होती. 


त्यानुसार आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने महापालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केलेले पदपथ मोकळे केले होते. त्यामुळे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले होते. मात्र महापालिकेची कारवाई थांबतच या फेरीवाल्यांनी आपले बस्तान पुन्हा त्याठिकाणी बसवले आहे


. या फेरीवाल्यांनी मुख्यतः नारळपाणी वाल्यांनी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुका पोलीस ठाणे समोरील शासकीय जागा, विविध रुग्णालय परिसर तसेच तहसीलदार कार्यालय परिसरात या परप्रांतीय फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. यामध्ये या फेरीवाल्यांनी नारळविक्रीसह सरबतची दुकाने सुद्धा सुरु केली आहे. त्यामुळे हे परप्रांतीय फेरीवाले महापालिकेच्या कारवाईला भीक घालत नसल्याचे दिसून येत आहे. आता या परप्रांतीय फेरीवाल्यांवर महापालिका कोणती कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. 



थोडे नवीन जरा जुने