करंजाडेमधील सेक्टर ३, ४, ५ व ६ मध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही. एकीकडे नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर जागे राहावे लागत आहे; तर दुसरीकडे सिडको प्रशासनातर्फे सोसायट्यांना दोन ते तीन दिवसांनी एखादा टँकर दिला जात असल्याने रहिवाशांवर विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे.
पनवेल परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा कमी झाला आहे. यामुळे पनवेल परिसरातील सिडको वसाहतींमध्ये सध्या पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे. करंजाडेतील काही सेक्टरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. एमजेपीकडून पाणीपुरवठा कमी होत असल्याने त्याचा परिणाम सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
त्यात सिडकोच्या जुन्या वाहिनीवरून पाणीपुरवठा बंद केल्यास कुंडे बहाळ आणि वरचे ओवळे या गावांचा प्रश्न निर्माण होत असल्याने सध्या उंचावर असलेल्या करंजाडे भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच अनेक घरामध्ये लग्नसराई असल्याने घरात पाणी नसल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.
Tags
करंजाडे