पनवेल दि.१९ (संजय कदम) : समाजात आजही पोलिसांविषयी आदर आणि तितकीच भीतीही आहे. त्यामुळेच समाजातील पोलिसांविषयी प्रतिमा सुधारण्याबरोबरच पोलिसांनीही आत्मसन्मान न गमावता स्वाभिमानाने काम करावे, असे आवाहन कॅनडा पोलिस दलातील वरिष्ठ टास्क फोर्स अधिकारी सत्यानंद गायतोंडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केले.
सांगली पोलिस दलाच्या वतीने पोलिसांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत कॅनडा पोलिस दलातील वरिष्ठ टास्क फोर्स अधिकारी सत्यानंद गायतोंडे यांनी उपस्थित पोलिसांना मार्गदर्शन केले. सत्यानंद गायतोंडे हे मूळ मुंबई, गिरगाव येथील रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅनडा पोलीस दलात उच्च पदावर कार्यरत आहेत
. आपल्या मायभूमीवर असलेल्या प्रेमापोटी ते आपल्या मातृभूमी येऊन आपल्या पोलीस बांधवांना मार्गदर्शन करत असतात. आता पर्यंत त्यांनी सुमारे १०० हुन अधिक शिबिरांमध्ये पोलिसांना मार्गदर्शन केले आहे. यावेळी सत्यानंद गायतोंडे यांनी मानसिक व्यवस्थापन आणि परदेशी पोलिसांसारखे कसे वागावे या विषयावर उपस्थित पोलिसांना मागर्दर्शन केले.
यावेळी गायतोंडे म्हणाले की, परदेशातील पोलिसिंग आणि भारतातील पर्यायाने आपल्या राज्यातील पोलिसिंग यात मोठा बदल आहे. पोलिस ठाण्यातील वातावरण तिकडे हलके ठेवण्याकडे सर्वांचाच भर असतो. भारतात याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. त्यामुळेच पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येकाला समोर असलेला पोलिस कर्मचारी हा आपला आधार वाटला पाहिजे. पोलिसांविषयी भीती नको तर आदर वाटला पाहिजे. पोलिस ठाण्यात असताना आनंदी, उत्साही राहिल्यास त्याचाही कामकाजावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. अंगावर चढवलेल्या खाकीला खूप महत्त्व असल्याने नव्याने पोलिस दलात दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांनीही त्याचा सन्मान राखला पाहिजे. आदर्शवत काम केल्यावरच खाकीचा मान राखला जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी सांगली शहर पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, सांगली ग्रामीणचे निरीक्षक शिवाजी गायकवाड, संजयनगरचे सहायक निरीक्षक संजय क्षीरसागर उपस्थित होते.
Tags
पनवेल