संकल्प नशामुक्तीचासंकल्प नशामुक्तीचा 
व्यसन वाचनाचे, व्यायामाचे,अभ्यासाचे, माणुसकीचे असेल तर करिअर घडते....लौकीक वाढतो. पण व्यसन जर दारूचे असेल, सिगारेटचे असेल किंवा अन्य नशिल्या पदार्थांचे असेल तर करिअर बिघडते. करिअरच नव्हे तर स्वतःसह कुटूंब उध्वस्त होते. 


आयुष्य घडवण्याला किंवा बिघडवण्याला आपण स्वतः कारणीभूत असतो. फक्त योग्यवेळी योग्य दिशा दाखवण्याची गरज असते. ती योग्य दिशा दाखवण्याचा *‘संकल्प नशामुक्तीचा* या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे ग्रामिण पोलीस करत आहेत. लोणावळा हे देशातील मोठे पर्यटनस्थळ आहे. लोणावळ्याचा इतिहास हा अत्यंत आशावादी आहे. मात्र काहींनी लोणावळ्यात नको ते उद्योग करत या आशावादाला टोकण्याचे काम सुरू केले आहे. सिंहगड हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. या किल्ल्याच्या पायथ्याला रेव्ह पार्टी करण्यापर्यंत मजल गेलेल्यांची नशा पोलिसांनी कायद्याने उतरवली होती. 


अलिकडच्या काळात पुणे जिल्ह्यात हे फॅड वाढण्याची भिती व्यक्त केली जात होती. लोणावळ्याचे सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक (IPS) यांनी या सामाजिक भितीला चाप लावण्याचा मानस व्यक्त केला. पुणे ग्रामिणचे पोलीस अधिक्षक मा. अंकित गोयल सर यांनी या संकल्पनेला हिरवा कंदील दाखवला. 


‘संकल्प नशामुक्तीचा’ या दोन शब्दाच्या टॅगलाईनखाली पोलिसांनी उपक्रम यशस्वी करण्याची मोहीम हाती घेतली. एखादा उपक्रम हाती घेतल्यावर तो तडीस जाईपर्यंत आपण भक्कमपणे उभे रहायचे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळे वरिष्ठांच्या सुचनेला प्राधान्य देत या उपक्रमात सहभागी होताना क्षणभरही वेळ लागला नाही. लोणावळा उपविभागातले सर्व अधिकारी आणि अंमलदारांनी हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी पूर्ण झोकून दिले. 


अभिनेता सुनिल शेट्टी लोणावळयाचे राहिवासी असून त्यांनी वयाच्या ६२ व्या वर्षीही सुपारीच्या खांडाचे व्यसन नसल्याचे आवर्जुन नमूद केले. आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी त्यांनी सर्व दिनक्रम घडयाळाच्या काटयानुरुप ठेवत शिस्त जाणीवपूर्वक अवलंबली आहे. बोले तैसा चाले अशा दुर्मिळ स्वभाव प्रवृत्तीच्या सुनिल शेट्टी यांचे वेगळेपण चित्रपटांच्या मायावी जगतात उठून दिसते. त्यांनी नशामुक्तीचा संदेश देत सामाजिक बदल घडवण्याचा प्रयत्न जपला आहे. अभिनेता सुनिल शेट्टी यांनी पुणे ग्रामिण पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतूक करत स्वतः पुढाकार घेऊन सर्व भार उचलण्याचा प्रयत्न केला. संकल्प नशामुक्तीचा याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी सरसावलेले सुनील शेट्टी हे साध्या वेशातील एक पोलीस आणि पडद्याबाहेरचे खरे हिरो असल्याचे जाणवले. 


संकल्प नशामुक्तीच्या उपक्रमाला रविवारी सकाळी सुर्योदयावेळी ५ किमी मॅरोथॉनने सुरूवात झाली अन् पावसाचा मंद शिडकावा सुरू झाला. त्यामुळे या उपक्रमाला उत्साहाला उधाण आले. 
या उत्साही वातावरणात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक मा. सुनील फुलारी सर यांनी मादक पदार्थांचे सेवन आरोग्याला किती व कसे हानीकारक आहे हे सांगतानाच व्यसन चांगल्या कृतीचे असावे.. जी कृती आपले करिअर घडवेल आणि आयुष्य सुखकर, आरोग्यमय करेल असे सांगितले. अध्यात्म आणि वाचन याचा समन्वय साधला तर आपण यशोशिखर कसे गाठू याचा मार्ग त्यांनी सांगितला. संकल्प व्यसनमुक्तीचा हा उपक्रम राबवताना काही टप्पे नियोजित केले आहेत. या टप्प्यात पहिले प्राधान्य हे जनजागृती व प्रत्यक्ष संवादाला आहे. साधारणतः वयाच्या १५ ते ३५ वर्षादरम्यान व्यसनांच्या मोहाला पडण्याची शक्यता जास्त असते. अर्थात यांत स्त्री - पुरुष किंवा गरीब - श्रीमंत असा कोणताच भेद नसतो. पिनेवाले को पिने का बहाणा चाहिये.. प्रमाणे व्यसनाची मगरमिठी सोडवणं शक्य होत नाही. नेमके याबाबत तरुणाईशी संवाद करत व्यसनांच्या दुष्परिणामांची जाणीव करुन देणे गरजेचे आहे. त्यानंतर मादक पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्या विघातक प्रवृत्तीवर प्रभावी कायदेशीर कारवाई करत त्यांना तुरूंगाची हवा खायला पाठवणे हा पुढचा टप्पा असेल. व्यसनाच्या वाटेवरच्या तरुण तरुणीला आरोपी न मानता पिडीत समजून त्याला चुकलेल्या वाटेवरुन सन्मार्गावर ओढून आणण्यासाठी समुपदेशन उपयुक्त ठरु शकते. यांत पिडीतेच्या कुटुंबियांची भूमिका फार मोलाची आहे. त्यांच्या आधाराचा हात व्यसनांच्या अंधार कोठडीतून आशेच्या किरणांकडे नेण्यास कारणीभूत ठरु शकतो. 
 व्यसनाधीन व्यक्तीच्या चारित्र्याबद्दलची संशयाची सूई त्याच्या आणखी अधःपतनाला कारणीभूत ठरते. त्यामुळे स्वतःची चूक उमजून व्यसनांकडे पाठ फिरवणाऱ्या व्यक्तीला त्याच्या स्वावलंबी आयुष्यक्रमणासाठी त्याचे पुर्नवसन तितकेच महत्वाचे आहे. या साऱ्या प्रक्रियेत आमच्या सहकारी मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर यांनी मोलाचे योगदान दिले. पुढेही हा उपक्रम यशस्वी व्हावा आणि यातून युवा पिढीसह अनेक कुटूंबात आनंदाचा दिवा तेवत रहावा असा ध्यास त्यांनी घेतल्याचा विश्वास दिला. 


 एकूणच पोलीस गुन्हेगाराला चाप लावू शकतात....त्याला वठणीवर आणण्यासाठी कायद्याने जे आवश्यक ते करू शकतात. पण व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना निर्व्यसनी म्हणून समाजात वावरायला लावण्याचे आव्हानात्मक काम पुणे ग्रामिण पोलिसांनी हाती घेतले आहे. हे आव्हानाचे धनुष्य एकजुठीने पेलले जाईल असा विश्वास बाळगायला हरकत नाही. फक्त या...तुम्ही सर्व संकल्प नशामुक्तीच्या उपक्रमात सहभागी व्हा....सदृढ समाज घडवा....आम्ही सोबत आहोतच....
थोडे नवीन जरा जुने