विचुंबे येथील नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजनविचुंबे येथील नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन

पनवेल तालुक्यातील विचुंबे गावाजवळ गाढी नदीवर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते रविवारी (दि. २५) करण्यात आले. या पुलासाठी भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकाऱ्यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. या पुलामुळे नवीन पनवेल ते विचुंबे, पाली देवद, उसली, शिवकर, मोहो पाली असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.विचुंबे व परिसरातील नागरिकांना आता अस्तित्वात असलेल्या अरूंद पुलामुळे निर्माण होत असलेल्या अडचणी मला माहीत आहेत. याबद्दल मला आमदार प्रशांत ठाकूर यांनी ज्ञात केले आणि नवा पूल बांधणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी यासाठी पाहणी केल्यानंतर जागा पक्की करण्यात आली.. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हातून हे कार्य व्हावे असे ईश्वरालाही वाटत होते. ऑक्टोबर २०२४ च्या आधी या पुलाचे उद्घाटनही तुमच्या सर्वाच्या उपस्थितीत होईल यात काही शंका नाही, असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, विचुंबे, देवद, उसली या सर्व ग्रामस्थांच्या दृष्टिकोनातून अतिशय आनंदाचा आणि भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या दृष्टीने अभिमानास्पद क्षण आहे. हा क्षण ज्यांनी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आणला ते सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून आभार करतो. विचुंबे येथील गाढी नदीवरील नवीन पूल त्यांनी मंजूर केला व आज त्याचा शुभारंभ होतोय. येथे राहणारे गावातील ग्रामस्थ असो की सोसायटीतील रहिवासी असो सगळ्यांच्या भावना या पुलाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आताचा जो पूल अस्तित्वात आहे तो छोटा असल्याने त्या पुलावरून वाहतूक करणे विशेषतः नोकरदार मंडळींसाठी जिकिरीचे बनले आहे. मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही समस्या सोडविण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी पूर्ण केला आहे. आता नव्या पुलाचे काम सुरू होऊन भविष्यात वाहतूक सुरळीत होईल. या पुलाच्या उद्घाटनालाही मंत्री चव्हाणसाहेबांनी यावे अशी आमची इच्छा आहे.


थोडे नवीन जरा जुने