नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी- प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये






नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी- प्रदेश प्रवक्ता केशव उपाध्ये 
राज्यात महाविकास आघाडी नाही तर महाहतबल आघाडी 
पनवेल (प्रतिनिधी) मोदी सरकारच्या कारकिर्दीतील गेल्या नऊ वर्षांची देशाची वाटचाल ही देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीतील सर्वाधिक तेजस्वी वाटचाल ठरली आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे
 मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये यांनी पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली. 

देशाचे कार्यकुशल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली. या काळात देशाच्या विकासाची मोठी पावले उचलतानाच जागतिक स्तरावर भारताची मान उंचावण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार योजना, विकास कामे, निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपतर्फे मोदी @ ९ महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना माहिती देण्यात आली. 

पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ता सागर भदे, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अविनाश कोळी, जिल्हा प्रवक्ता प्रकाश बिनेदार, विनोद साबळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, शहर सरचिटणीस अमरीश मोकल आदि उपस्थित होते. 

 केशव उपाध्ये यांनी पुढे पत्रकारांशी पुढे संवाद करताना सांगितले कि, ‘शासनव्यवस्थे’स ‘सुशासनव्यवस्थे’त बदलण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ध्यास आहे, गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने आठशेहून अधिक योजना कार्यान्वित केल्या. यापैकी काही योजना अगोदरही अस्तित्वात होत्या. केंद्र सरकारने त्यांना नवा आकार दिला. दर चार दिवसागणिक एक नवी किंवा सुधारित योजना देशात साकारली आहे, आणि त्याचे लाभ सामान्य जनतेला मिळत आहेत. रशिया-युक्रेन युद्धातील भारताची भूमिका, ग्लास्गो परिषदेतील पर्यावरण विषयक आराखडा, संयुक्त राष्ट्र, बिम्सटेक, जी-२० अशा आंतरराष्ट्रीय मंचांवरही आज भारताची भूमिका महत्वाची ठरली आहे. कोरोनाकाळात भारत हा जगाला मदतीचा हात देण्यासाठी पुढे सरसावलेला पहिला देश ठरला. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ ही केवळ घोषणा नाही, तर ते विकासाचे ‘ध्येयवाक्य’ झाले आहे. विविध सर्वेक्षणांतून, जगभरातील लोकशाही राष्ट्रांमधील जनतेने मोदी यांच्या नेतृत्व क्षमतेवर पसंतीची मोहोर उमटविली आहे. एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या देशात अत्यल्प काळात कोविडविरोधी लसीचे संशोधन आणि प्रत्येकाचे लसीकरण ही जगाच्या दृष्टीने अशक्य वाटलेली बाब मोदीजींच्या नियोजन शैलीमुळे सहज साध्य झाली. याच संकटकाळात देशातील ८० कोटी लोकसंख्येवराल अन्नसंकटाचे सावट ओळखून मोदीजींनी आखलेली आणि कोणत्याही घोटाळ्याविना यशस्वी ठरलेली गरीब कल्याण अन्न योजना हा एक चमत्कार ठरला आहे. 

भ्रष्टाचारमुक्त सुशासन, सर्वांच्या सहयोगाने सर्वांचा विकास, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातून कन्याजन्मास प्रतिष्ठा मिळवून देणारा विचार, बेघरांना हक्काचे छप्पर देणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतून अडीच कोटींहून अधिक कुटुंबांना मिळालेली सावली, जल जीवन मिशन द्वारे २० कोटी घरांत पोहोचलेल्या पेयजलाच्या वाहिन्या, उज्ज्वला योजनेतून साडेआठ कोटी घरांत आलेली गॅस सिलिंडर्स, सौभाग्य योजनेतून तीन कोटी घरांना मिळालेली वीज जोडणी व सुमारे ४० कोटी एलईडी बल्बमुळे उजळलेली घरे ही मोदीजींच्या ध्येयासक्तीची दृश्य उदाहरणे आहेत. मिशन इंद्रधनुषद्वारे देशभरातील कोट्यवधी बालकांचे लसीकरण व जनआरोग्य योजनेतून देशातील साडेतीन कोटींहून अधिक कुटुंबांना मिळणारी मोफत उपचार सुविधा ही त्यांच्या सामान्य जनतेपोटीच्या ममत्वाची साक्ष आहे. अटल पेन्शन योजना, जनधन योजना यासारख्या योजना म्हणजे सामान्यांच्या आर्थिक स्थितीला उर्जितावस्था देण्याच्या प्रयत्नांचा पुरावा आहे. मोदीजींच्या द्रष्ट्या नेतृत्वामुळे देशातील महिला, बालके, तरुण, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, उपेक्षित, बुद्धिजीवी आणि समाजातील प्रत्येक घटकाला प्रगतीची नवी वाट सापडली आहे. 

युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्य, ज्येष्ठ नागरिक, अशा प्रत्येक समाजघटकाचे प्रत्येक योजनेशी नाते जडले आहे. देशातील प्रत्येक योजनेशी कोणत्या ना कोणत्या रूपाने जोडला गेलेला नाही असा एकही समाजघटक नाही. डिजिटल इंडिया, स्टार्टअप-स्टँडअप इंडिया, आयुष्मान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, जलजीवन मिशन, किसान सम्मान निधी, मुद्रा योजना, स्वनिधी योजना, वन नेशन-वन राशन कार्ड, सुगम्य भारत, नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण, कौशल्य विकास, खेलो इंडिया, मिशन कर्मयोगी, स्वच्छता मिशन, पासपोर्ट सेवा, श्रम सुधार, स्वामित्व, पीएलआय, भारतमाला, अशा असंख्य योजनांच्या मालिकेने देशातील प्रत्येक नागरिकास जोडून घेतले आहे. विकासाच्या या वाटचालीतून कोणीही वंचित राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. 


 देशाच्या ग्रामीण भागातील गरीबी दूर करण्याच्या प्रयत्नांचे पहिले पाऊल म्हणून दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय आजीविका मिशन- या योजनेचा उल्लेख करावाच लागेल. या योजनेतून जवळपास आठ कोटी महिला सुमारे ७० लाख स्वयंसहायता समूहांद्वारे या योजनेशी जोडल्या गेल्या, तर जवळपास साडेतीन लाख महिला प्रशिक्षित होऊन अन्य महिलांना आत्मविश्वास देऊ लागल्या. १४ हजार कोटींहून अधिक रक्कम सामूहिक गुंतवणुकीच्या रूपात या योजनेतून उभी राहिली. सन २०१३-१४ पासूनच्या ‘मोदी युगा’त, चार लाख कोटींहून अधिक रकमेची कर्जे या योजनेतून उद्यमशीलता फुलविण्याकरिता ग्रामीण भारतात वितरित केली गेली. ३० हजारांहून अधिक महिलांची फौज ‘बीसी सखी’ (बिझिनेस करस्पॉन्डन्ट सखी) म्हणून या योजनेच्या यशासाठी कार्यरत झाली. तीन लाखांहून अधिक महिला सामुदायिक संसाधन स्रोत, कृषी सखी, पशु सखी, बँक सखी, विमा सखी, अशा विविध रूपात ग्रामीण कुटुंबांच्या सक्षमीकरणाच्या या आगळ्या मोहिमेत सहभागी झाल्या. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेतून सुमारे १३ लाख युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, तर सात लाखांहून अधिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. देशभर सहाशेहून अधिक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कार्यरत झाल्या असून सुमारे ४० लाख युवकांना प्रशिक्षण प्राप्त झाले आहे. तीस लाख युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत. स्मार्ट सिटी, अमृत योजना, भारतमाला, सागरमाला, राष्ट्रीय महामार्ग विकास आदी अभिनव योजनांतून शाश्वत विकासाबरोबरच, विदेश नीतीचा एक नवा आदर्श मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रस्थापित केला आहे. इंटरनॅशनल सोलार अलायन्स, भारत, जपान, अमेरिका त्रिपक्षीय संवाद, उपखंडातील सुरक्षेसंबंधीची रोखठोक भूमिका, आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय मंचावर निर्भयपणे मांडलेली भूमिका, आदी अनेक बाबींमुळे देशाला प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली आहे, असेही केशव उपाध्ये यांनी यावेळी नमूद केले. 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हंटले कि, कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्ष पुर्ण झाले आहे. त्या अनुषंगाने मोदी @९ महासंपर्क अभियान अंतर्गत सेलिब्रेशन ऐवजी नागरिकांशी कम्युनिकेशन असे कार्यक्रमे आयोजित करण्यात आले आहेत. मावळ लोकसभा मतदार संघात रायगड जिल्हयातील पनवेल, कर्जत, उरण हे तीन मतदार संघ येतात. त्या अनुषंगाने या तीनही मतदार संघात विविध कार्यक्रमे पार पडत आहेत. त्यामध्ये टिफिन बैठक, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, संयुक्त मोर्चा संमेलन, योग दिन, लाभार्थी संमेलन, विकास तीर्थ, व्यापारी संमेलन, प्रबुद्ध नागरी संमेलन, व्हर्चुअल रॅली, घरोघरी संपर्क, विशाल रॅली, जाहीर सभा अशा विविध स्वरूपाच्या कार्यक्रमांचा समावेश असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. 




थोडे नवीन जरा जुने