पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करामध्ये शिक्षण विषयक कराचा समावेश आहे. गेल्या साडेसहा वर्षांनंतरही सिडको वसाहतींमध्ये मनपा अशिक्षित असल्याचे एकंदरीत चित्र आहे. या ठिकाणी महापालिकेने शाळा सुरु कराव्यात अशी मागणी शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांना सुद्धा त्यांनी निवेदन सादर केले आहे.
पनवेल मनपा ने पाणीपुरवठा वगळता इतर सर्व सुविधा सिडको कडून वर्ग करून घेतल्या आहेत. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सोयी सुविधा पुरवण्याबाबत प्रशासन चांगले प्रयत्नही करीत आहे. मात्र अद्यापही महापालिकेने आपल्या स्वतःच्या शाळा हद्दीत सुरू केलेल्या नाहीत.
वेगवेगळ्या कारणासाठी आरक्षित असणारे भूखंड पनवेल महापालिकेने सिडको कडून हस्तांतरित करून घेतले आहेत. काही भूखंड हे शाळेसाठी राखीव आहेत. त्या ठिकाणी पनवेल महापालिकेने स्वतःच्या शाळा सुरू कराव्यात अशी नागरिकांची अग्रही मागणी आहे. सिडको वसाहतीमध्ये अल्प व मध्यम उत्पादन गटातील लोकसंख्या मोठी आहे.
खाजगी शिक्षण संस्थांमधील भरमसाठ शुल्क अनेक पालकांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून या वसाहतीमध्ये सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून याबाबत ठोस असा निर्णय घेण्यात यावा. तसेच महापालिका प्रशासन आणि पनवेल महापालिकेच्या आयुक्तांना आपल्या हद्दीमध्ये मनपाच्या शाळा सुरू करण्याचे आदेश निर्गमित करावेत अशी विनंती शिवसेनेचे पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. या आशयाचे पत्र सुद्धा दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे..
Tags
पनवेल