कातकरी व्यक्तीची जमीन हडप करणाऱ्या घरत कुटुंबीय यांना अखेर अटक





कातकरी व्यक्तीची जमीन हडप करणाऱ्या घरत कुटुंबीय यांना अखेर अटक

कातकरी व्यक्तीचे वारस म्हणून आगरी समाजातील घरत कुटुंबीयांची नावांची नोंद

जाणीवपूर्वक सरकारी दस्तावेज मध्ये खाडाखोड करून अवैध हस्तांतरण करणारे तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार तसेच कागदपत्रांची कोणतीही तपासणी न करता एन ए परवानगी देणारे तत्कालीन तहसीलदार, उप विभागीय अधिकारी,जिल्हाधिकारी यांचा नंबर लवकरच लागणार
आदिवासी समाजातील लोकांचा एकच जल्लोष



उरण दि 27(विठ्ठल ममताबादे )मौजे दिघोडे तालुका उरण येथील सर्व्हे नंबर 94/8 आणि 100/1 ही पाच एकर जमीन मिळकत गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या नावे सात बारा सदरी होती. सदरहू जमीन अनेक वर्षांपासून कातकरी कुटुंब कसत होते. परंतु सन 1980 मध्ये गोपाळ लहाण्या कातकरी यांच्या मृत्यू नंतर सदरहू जमीन मिळकतीच्या सात बारा सदरी वारस नोंद होताना त्यांचींतीन मुळे पोश्या, लक्ष्मण आणि पांडुरंग यांची नावे दाखल होणे गरजेचे होते परंतु सन 1983 मध्ये तुळशीराम बाबू घरत, लहू बाबू घरत, अंकुश बाबू घरत, भरत बाबू घरत यांनी तत्कालीन तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांच्या संगनमताने फेरफार क्र 1283 अन्वये गोपाळ लहाण्या कातकरी यांचे वारस म्हणून आगरी समाजाचे वरील चार घरत कुटुंबीय यांची नावे सात बारा सदरी दाखल केली आणि ती आदिवासी खातेदारांची  पाच एकर जमीन मिळकत गैर मार्गाने फसवणूक करून आपल्या नावावर करून घेतली.






 सन 1995 पर्यंत कातकरी कुटुंब सदरहू जमीन कसत होते. घरत कुटुंबीयांनी सदरहू पाच एकर जमीन सन 1996 मध्ये कैलास सदाशिव सुर्वे यांना नोंदणीकृत खरेदी खताने विकली. कैलास सदाशिव सुर्वे यांनी त्या जागेचा कब्जा घेवून जागेवर कुंपण घालून कंटेनर  यार्ड सुरू करून व्यवसाय सुरू केला आणि त्यावेळेस आदिवासी कुटुंबाला त्या जागेवरून निष्कासित करण्यात आले. सन 2019 मध्ये जिल्हाधिकारी रायगड यांची कोणतीही परवानगी न घेता कैलास सदाशिव सुर्वे यांनी तत्कालीन तहसिलदार कल्पना गोडे यांनी संगनमताने सदरहू जमीन बिनशेती केली. आदिवासी खातेदारांची जमीन कोणत्याही प्रकारे हस्तांतरण करायचे असल्यास शासनाची पूर्व परवानगी आवश्यक असते, ह्या जमीन मिळकती च्या हस्तांतरण संदर्भात कोणतीही परवानगी घेतली नाही. 



गोपाळ लहाण्या कातकरी यांची नात मुक्ता अनंता कातकरी यांनी ह्या विषयी प्रथम उरण सामाजिक संस्थेकडे मदत मागितली. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांच्या मार्गदरशनाखाली उप विभागीय अधिकारी यांच्या कोर्टात फेरफार पुनर्विलोकन अपील दाखल केले. उप विभागीय अधिकारी श्री राहुल मुंडके यांनी सदरहू केस गुणवत्तेवर चालवून अंतिम निर्णयापर्यंत ठेवली. त्यावर कैलास सदाशिव सुर्वे यांनी महसूल मंत्री न्यायालयात दाद मागितली.  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील गुणवत्तेवर सदरहू अपील अंतिम निर्णयावर ठेवले. न्याय मिळण्यासाठी विलंब होवू लागल्याने मुक्ता कातकरी यांनी शेवटी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्याचे ठरविले. ॲड सिद्धार्थ इंगळे यांनी कायदेशीर बाजू सांभाळली.  पोलीस सह आयुक्त  संजय मोहिते, मान सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक  संदीपान शिंदे आणि पोलीस उप निरीक्षक सोनवणे, श्री कोळी, श्री गायकवाड  यांनी कातकरी महिलेची बाजू समजावून घेतली आणि दिनांक 08/05/2023 रोजी अट्रोसिटी कायद्या अंतर्गत घरत कुटुंबीय, कैलास सदाशिव सुर्वे आणि महसूल कर्मचारी यांच्या विरोधात अट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. 



हे प्रकरण हाताळताना कोंकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर , जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे, उप विभागीय अधिकारी श्री राहुल मुंडके, तहसीलदार पनवेल विजय तळेकर, माजी तहसीलदार उरण  भाऊसाहेब अंधारे, तहसीलदार उरण उद्धव कदम, नायब तहसिलदार नरेश पेडवी, निवासी तहसीलदार  धुमाळ यांनी खूप सहकार्य केले. मंगळवार दिनांक 25/07/2023 सकाळी तुळशीराम बाबू घरत, भरत बाबू घरत, अंकुश बाबू घरत यांना सहाय्यक पोलिस आयुक्त  धनाजी क्षीरसागर,  सचिन गोडे, श्री मेहेकर यांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांना पनवेल सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आत्ता पुढील नंबर कैलास सुर्वे आणि चुकीच्या पद्धतीने  जमिनीचे हस्तांतरण करणारे सर्व भ्रष्ट महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा असणार आहे.


थोडे नवीन जरा जुने