कर्नाळा बँकेचा प्रश्न पुन्हा विधिमंडळात; उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा कायम


कर्नाळा बँकेचा प्रश्न पुन्हा विधिमंडळात; उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा कायम 

पनवेल(प्रतिनिधी) कर्नाळा नागरी सहकारी बँक दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी अवसायनात घेतली आहे. अवसायन दिनांकास ५१,६२४ ठेवीदारांच्या ५५३.३२ कोटी रकमेच्या ठेवी आहेत. बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर ३८ हजार ६३९ ठेवीदारांना केंद्र सरकारच्या डीआयसीजीसी माध्यमातून आजपर्यंत ३७७.७१ कोटी रुपये मंजुर करण्यात आले. त्यापैकी २३,१२३ ठेवीदारांना ३७१.७४ कोटी रक्कम अदा करण्यात आलेली असून उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लेखी स्वरूपात दिली आहे.      पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक लि. या बँकेतील ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी मुंबई येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून पुन्हा एकदा ठेवीदारांचा आवाज बुलंद केला. पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक मर्या. बँकेतील संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे बहुतांशी खातेदार व ठेवीदारांना अद्यापही त्यांच्या ठेवी परत मिळाले नाहीत. या बँकेतील गैरव्यवहारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या संचालक व कर्मचाऱ्यांवर संबंधित विभागामार्फत ठोस कारवाई होत नसल्यामुळे खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या बँकेतील ठेवी मिळण्यास विलंब होत आहे. या प्रकरणी शासनाने चौकशी करुन सदर बँकेतील सामान्य लोकांच्या ठेवी त्यांना परत मिळण्यासाठी तसेच बँकेतील गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्या संचालक व कर्मचाऱ्यांच्या स्थावर जंगम मालमत्तेचा लिलाव करुन ठेवीदाराला पैसे देण्याबाबत कोणत्या उपाययोजना व कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असे या तारांकित प्रश्नात नमूद करून विचारणा केली आहे.           नामदार दिलीप वळसे पाटील यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हंटले आहे कि, पनवेल येथील कर्नाळा नागरी सहकारी बँक मर्या. बँकेतील संचालकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे बहुतांशी खातेदार व ठेवीदारांना अद्यापही त्यांच्या ठेवी परत मिळाले नाहीत. या बँकेतील एकुण ६३ कर्ज प्रकरणात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी बँकेचे तत्कालीन संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्जदार अशा एकुण ६३ जणांवर दिनांक १७ फेब्रुवारी २०२० रोजी गुन्हा क्र.७८/२०२० दाखल करण्यात आला असून त्याबाबतचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाळा बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर संबंधित व्यक्ती यांच्या ७० मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंरक्षण अधिनियम १९९९ मधील तरतुदीनुसार जप्त केल्या आहे.

 बँकेतील गैरव्यवहाराच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमाच्या कलम ८८ अन्वये चौकशी करण्यात आली असून संचालक, अधिकारी / कर्मचारी अशा २० जणांवर रु.५२९.३७ कोटी रकमेची जबाबदारी निश्चित केली असून त्यानुसार वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले असून कर्नाळा नागरी सहकारी बँक लि. दिनांक १७ ऑगस्ट २०२१ रोजी अवसायनात घेतली आहे. अवसायन दिनांकास ५१,६२४ ठेवीदारांच्या ५५३.३२ कोटी रकमेच्या ठेवी आहेत. बँकेचा परवाना रद्द झाल्यानंतर केंद्र सरकारच्या डी. आय. सी. जी. सी कडून आजपर्यंत ३८,६३९ ठेवीदारांना ३७७.७१ कोटी रुपये मंजुर करण्यात आले असून त्यापैकी २३,१२३ ठेवीदारांना ३७१.७४ कोटी रक्कम अदा करण्यात आलेली आहे. उर्वरित ठेवीदारांच्या ठेवी अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे.थोडे नवीन जरा जुने