गायरान जमिनीवरील घरे कायम करावीत. वंचित बहुजन आघाडीची प्रशासनाकडे मागणी.







गायरान जमिनीवरील घरे कायम करावीत. वंचित बहुजन आघाडीची प्रशासनाकडे मागणी.



उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )
उरण तालुक्यामध्ये नव्याने बदली होऊन आलेले तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी उद्धव कदम यांना वंचित बहुजन आघाडी तालुका उरण व भारतीय बौद्ध महासभा तालुका उरण तर्फे त्यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत व अभिनंदन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौध्द महासभेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार उद्धव कदम यांच्या सोबत उरण भागातील महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली . यावेळी उरण तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तुकाराम खंडागळे, भारतीय बौद्ध महासभा उरण तालुका अध्यक्ष अमोल शेजवळ, उरण ता.संस्कार उपाध्यक्ष सदानंद सकपाळ,उरण शहर प्रमुख मुज्जमील तुंगेकर,कार्यकर्ते प्रभाकर जाधव व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



उरण तालुक्यातील गायरान जमिनीवर समाजातील वंचित, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, भटके व विमुक्त गरीब व मागासवर्गीय लोकांनी वर्षानुवर्षे पक्की घरे बांधली आहेत. काहींना घरकुले मिळाली आहेत. सर्वांची ग्रामपंचायतीला नोंदी आहेत. केवळ महसूल नोंद नाही म्हणून अशा परिस्थितीत त्यांचे गायरान अतिक्रमण काढू नये ते नियमित व कायमस्वरूपी करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील शेकडो मागासवर्गीय लोकांसमवेत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे यांनी तहसीलदारांकडे केली आहे.



समाजातील वाढती लोकसंख्या व गावात अपुरी घरजागा असल्याने त्यातच एका कुटुंबाची अनेक कुटुंबे झाल्याने व स्वतः ची जमीनही नसल्याने मागासवर्गीय लोकांनी गायराणात पक्की व शेडवजा घरे बांधली आहेत. भटके विमुक्त, मागासवर्गीय लोकांना काम केल्याशिवाय दोन वेळचे पोटाला मिळत नाही.त्यामुळे विस्थापित झालेल्या व परिस्थितीने असाह्य झालेल्या लोकांच्या घरांची अतिक्रमणे न काढता ती कायमस्वरूपी करण्यात यावीत अशी आग्रही मागणी तुकाराम खंडागळे यांनी तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर गायरान जमिनीवरील घरे कायम करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये दि.20 जुलै 2023 रोजी विधानभवनावर मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सर्व गायरान धाराकांनी मोठया संख्येने सामील व्हावे असे आवाहन तालुका अध्यक्ष तुकाराम खंडागळे यांच्याकडून करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने