चार दिवस अनुभवलेली इर्शाळवाडी







चार दिवस अनुभवलेली इर्शाळवाडी
         दुर्घटनेच्या नंतर श्रीक्षेत्र पंचायतन मंदिरामध्ये राहिलेल्या वाडी मधील बांधवांना शासनाने स्थलांतरित केले त्या पहिल्या क्षणापासून ते त्यांच्या स्वतःच्या घरात जाईपर्यंतच्या स्थलांतरणाच्या कालावधीत खूप काही अनुभवले! 
नेत्यांचे व्हीआयपी कल्चर अगदी जवळून पाहिलं ,
त्याचवेळी ढिगळ लावलेला कपडा अंगावर नेसून आपल्या राहिलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेल्या आदिवासी बांधवांचे राहणीमान पाहून खूप विरोधाभास जाणवला. 




    व्हीआयपी लोकांचे दौरे पाहून वाटत होते पुन्हा वाडी पुनर्जीवीत होईल पण!
 त्यामधील असलेला आपल्या माणसांचा गंध त्यात कसा भरता येईल,..?? या विचाराने मन सुन्न होत होते.
         कोणाचा भाऊ,कोणाची बहीण, कोणाचे आई-बाबा तर कोणाचे अख्ख कुटुंब क्षणात होत्याचे नव्हते झाले प्रत्येक वेळी जेवण वाढताना त्यांच्या डोळ्यात ते भाव दिसत होते. रात्रीच्या वेळी झोपेत असताना एकांतात रडणारे त्यांचे आवाज ऐकून मन हेलावून गेल. पण आम्ही सुद्धा नियतीच्या खेळापुढे हतबल होतो. 

भाऊ आणि प्रितम दादांच्या खंबीर आधारामुळेच आम्ही त्यांना थोडाफार का होईना धीर देऊ शकलो , त्यांच्यात राहून त्यांच्यातलेच होऊन पुन्हा नव्याने आयुष्य सुरू होईल अशी एक आशा देऊ शकलो.
 मला खरा प्रश्न पडला आहे तो सध्या त्यांना ज्या निसर्गाच्या सानिध्यातच परंतु पत्र्याच्या कंटेनर मध्ये स्थलांतरित करून सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे त्यामुळे त्यांचे जीवन पूर्वपदावर येईल का? 
त्यांच्या उदरनिर्वाहासाठी विविध योजना राबविणार सांगितले पण त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचेल का? 


 रात्रीच्या वेळी जिल्हाधिकारी ,प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, जिल्ह्यातील पोलीस अधिकारी सोबत कुटुंबातील मोठ्या भावाप्रमाणे स्वतः प्रितमदादा दोन वाजेपर्यंत बसून दिवसभरातील गोळा केलेली माहिती स्वतः जातीने पाहत होते यामुळे एक सकारात्मक यांच्याकडून आशा आहे. 
 दत्तक घेणारे हात बरेच पुढे आले परंतु त्या बांधवांपर्यंत योग्य नियोजन शासन करेल का? 


        
चार बिस्किटाचे पुढे आणून आठ फोटो काढणारे काही चमकते तारे सुद्धा जवळून पाहिले एक-दोन वेळा रहावले नाही त्यांना थेट हटकून मदत करू नका असे सुद्धा सुनावले.
   कटू आठवणी बऱ्याच आहेत परंतु एक समजले आपण ज्यांच्या सोबत काम करतो त्यांच्या विचारांची छाप आपल्या कृतीतून गरजवंतापर्यंत पोहोचते. माझ्यासारख्या अनेक जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सदस्यांनी विविध सेवा दिली यामधून त्या बांधवांना अशा परिस्थितीत रायगडासोबतच अख्खा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे असा मायेचा ओलावा नक्कीच मिळाला असेल.



थोडे नवीन जरा जुने