पुणे _ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी निधन







पुणे _ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी निधन
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे पुण्यात निधन
पुणे _मराठी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी (वय – ७७) यांचा आंबी (ता.मावळ) येथे एका बंद खोलीत शुक्रवारी (ता.१४) रात्रीच्या सुमारास मृतदेह आढळला आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते महाजनी हे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला.
दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे.



रवींद्र महाजनी रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील ह. रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत गेले. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते शालेय जीवनापासून नाटकात, चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करत होते. त्यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी. ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.



मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली. १९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला होता.



सन १९७५ ते १९९० चा काळ रवींद्र महाजनी यांनी गाजवला. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. त्या काळी ते अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. रवींद्र महाजनी यांचा ” मुंबईचा फौजदार” , देवता हे चित्रपट खूप गाजले. रवींद्र माहाजनी आणि रंजना देशमुख यांची जोडी त्यावेळी विशेष गाजली. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे.


थोडे नवीन जरा जुने