पनवेल तालुका पोलीस ठाणे अंतर्गत असलेली ८१ गावे तिसऱ्या डोळ्याच्या अधिपत्याखाली
पनवेल दि.२६ (संजय कदम) : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या निर्देशानुसार पनवेल तालुक्यातील जवळपास ८१ गावांमध्ये पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवून घेण्यात यश आले आहे. त्यामुळे आता या गावांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत मिळणार आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये ३३ ग्रामपंचायत असून त्यामध्ये ८१ गावांचा समावेश आहे. या गावांमधील बहुतांश परिसर हा डोंगराळ भाग तसेच निर्जन असल्याने सदर ठिकाणी प्रवासी वाहतुक ही कमी प्रमाणात होते. त्यामुळे समाजकंटक हे गैर कृत्य करण्यासाठी व स्वताचे अस्तित्व लपविण्यासाठी सदर ठिकाणांचा वापर करतात व गंभीर स्वरुपाच्या घटना घडतात. त्यामुळे पोलीसांना गुन्हयाच्या तपासामध्ये अधिक पराकाष्टा करावी लागते. हि बाब नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवून घेण्याची सूचना दिली होती.
त्यानुसार वपोनि अनिल पाटील यांनी सर्व गावांमधील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती यांची बैठक घेऊन सीसीटीव्हीचे महत्व पटवून दिले. तसेच त्यांच्याकडून सर्व गावांमध्ये लोकसहभागातून सीसीटीव्ही बसवून घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास सर्वच गावांनी आपल्या हद्दीत सीसीटीव्ही बसवून घेतले आहे. त्यामुळे आता गुन्हयाच्या तपासकार्यात पोलीसांना योग्य ते सहकार्य मिळेल तसेच गंभीर (संभाव्य) स्वरुपाच्या घटनांना प्रतिबंध होऊन कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत मिळणार आहे.
Tags
पनवेल