आझाद कामगार संघटनेचा २६ जुलैला सिडको भवनावर आक्रोश मोर्चा


आझाद कामगार संघटनेचा २६ जुलैला सिडको भवनावर आक्रोश मोर्चा
पनवेल दि.२४ (वार्ताहर) : सिडको मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असणाऱ्या कंत्राटी सफाई कामगारांच्या वारसांना कामावर घेण्यास प्राधिकरणाकडून टाळाटाळ केली जात आहे. सिडकोच्याच प्रथेला सिडकोच बगल देत असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात गेल्या दोन महिन्यांपासून आझाद कामगार संघटना विशेष रेल्वे प्रकल्प सिडको प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहे. याबाबत दोन दिवसात निर्णय न झाल्यास 26 जुलै रोजी सिडको भवनावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.


                गेल्या तीन दशकांपासून सिडको महामंडळाकडे हे सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. वास्तविक पाहता त्यांना कायम करून घेणे आवश्यक होते परंतु त्याकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. त्यांचे अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. महामंडळाकडे आरोग्य, अभियांत्रिकी, सिडको रेल्वे प्रकल्प या विभागाकडे जवळ जवळ 700 कामगार काम करतात. मात्र ज्यांचे 60 वर्षे वय पूर्ण झाले आहे. त्यांना कामावर न घेण्याचे आदेश ठेकेदाराला सिडकोच्या विशेष रेल्वे प्रकल्प विभागाकडून देण्यात आले आहेत . यासंदर्भात विधी व कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांचे मत घेण्यात आलेले नाही. सिडको महामंडळामध्ये संबंधित सफाई कामगारांच्या वारसदारांना कामावर घेण्याची प्रथा गेल्या 27 वर्षापासून आहे.


 नियमानुसार सफाई कामगारांना त्यांच्या वेतन दरा व्यतिरिक्त जी प्रथा व लाभ सुरू केले आहेत ते बंद करता येत नाही. याच मुद्द्याच्या आधारावर आझाद कामगार संघटनेने सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून यासंदर्भात पत्र व्यवहार सुरू आहेत. परंतु प्राधिकरणाकडून याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याचे पाहून संघटनेच्या वतीने येत्या बुधवारी 26 जुलै रोजी सिडको भवनवर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनात दिला आहे.
कोट - सफाई कामगारांच्या वारसदारांना कामावर घेण्याची जवळपास गेल्या तीन दशकांपासून सिडकोची प्रथा आहे. तीच बंद पाडण्याचा घाट काही अधिकारी आणि ठेकेदारांनी घातला आहे. सानपाडा रेल्वे स्थानकावरील तीन सफाई कामगारांचे वारसदारांबाबत पत्र व्यवहार करून दोन महिने झाले तरी यावर निर्णय घेण्यात आलेला नाही. संबंधित कामगारांचे हातावर पोट आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सफाई कामगारांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करीत आहेत. दुसरीकडे सिडको अधिकारी आणि ठेकेदार यांचा संगनमताने संबंधित कामगारांचे आर्थिक मानसिक नुकसान करत आहेत. ही बाब अत्यंत वेदनादायी व चिड निर्माण करणारी आहे. या मागणीसाठी 26 जुलै रोजी सिडको वर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. - महादेव वाघमारे (संस्थापक, आझाद कामगार संघटना)


 
थोडे नवीन जरा जुने