वडाळे तलावाच्या संरक्षणासाठी नियमावली निश्चित करावी- अभिषेक पटवर्धन


वडाळे तलावाच्या संरक्षणासाठी नियमावली निश्चित करावी- अभिषेक पटवर्धन 

पनवेल(प्रतिनिधी) वडाळे तलावाच्या परिसरात येणाऱ्या नागरिकांसाठी नियमावली निश्चित करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात त्यांनी माहितीस्तव आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनाही प्रत दिली आहे. 


अभिषेक पटवर्धन यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, पनवेल शहर हे पुरातन काळापासून तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. ह्याच बाबीचा विचार करून आपण पमपा क्षेत्रातील इतर तलावांसोबतच प्रमुख अश्या वडाळे तलावाचे नुकतेच सुशोभीकरण पूर्ण केले. ह्या बद्दल आपले मनापासून अभिनंदन व आभार. आपल्या ह्या कार्याने पनवेल शहराच्या सौदऱ्यात भर पडत पनवेलच्या नागरिकांसाठी हक्काचे असे पर्यटन व विरंगुळा केंद्र तयार झाले आहे. अनेक नागरिक हे तिथे व्यायामासाठी चालण्याकरीता, मोकळा फेर फटका मारण्याकरीता, आपल्या मित्र, नातेवाईकांसोबत वेळ घालवण्यासाठी तेथे येतात. सुंदर परिसर, रम्य वातावरण, समोर अथांग असे तळे पाहून पनवेलकर नागरिक हा मोकळा श्वास घेत सुखावत असतो. परंतु काही नागरिक हे त्याच परिसरात चुकीचे वागणूक करताना आढळून येतात. काही नागरिक तळ्यामधील माशांना खायला घालताना दिसून येतात. पाव, कणिक, बिस्किटे, कुरमुरे इत्यादी प्रकार हे तलावात टाकून तलाव अस्वच्छ होताना दिसून येत आहे. ह्या बाबत अनेकदा तेथील सुरक्षा रक्षकांनी व काही सुजाण नागरिकांनी थांबवून काही काळासाठी बदल होताना दिसून येतो परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थे असते त्यामुळे त्या भागात माश्यांना खायला घालू नये, तलावात अन्न पदार्थ टाकू नये असे कायम स्वरूपी फलक लावावेत व सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून,तिथे दंडात्मक कार्यवाही देखील करावी. संध्याकाळच्या वेळेत गर्दी जास्त असते. काही नागरिक हे स्वतःचे स्पीकर माईक वापरुन तिथे गाणी गात नाचताना दिसून येतात. काही मोजक्या लोकांच्या मनोरंजनसाठी इतर लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे. सुरक्षारक्षकांची संख्या वाढल्यास अश्या नागरिकांना थांबवता येईल तसेच पूर्व परवानगी शिवाय लाऊड स्पीकर चा वापरकेल्यास दंड व जप्तीची कार्यवाही करावी. काही वेळेस लहान मोठी मुलं हे वॊकिंग ट्रॅकवर सायकल चालवताना आढळून येतात. तरी तलावच्या सर्व प्रवेशाच्या ठिकाणी उभे रॉड लावून केवळ एक व्यक्ती आत चालत येऊ शकेल अशी व्यवस्था असावी. संपूर्ण परिसरात सी सी टी वी बसवावेत जेणे करून अमानुष व अनपेक्षित प्रकार होण्यापासून रोखता येतील. तलाव परिसरात कचरा पेटी ची संख्या अगदीच कमी आहे. त्यामध्ये वाढ करावी तसेच तलाव परिसरात कचरा साठलेला दिसून आल्यास तेथील स्वच्छता अधिकारी/कर्मचाऱ्यांचा नंबर दर्शनी भागात लावावा. स्केट बोर्ड/रोलर स्केट बोर्ड चा वापर हा वॉकिंग ट्रॅक वर करू नये. ह्या व अश्या सूचनांचा एकत्रित फलक हा प्रमुख भागांत लावण्यात यावा व नियमावली निश्चित करावी, अशी मागणी या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. 
 


थोडे नवीन जरा जुने